पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना लस !

लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला प्रारंभ

नवी देहली – कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या तिसर्‍या टप्प्याला १ मार्चपासून देशभरात प्रारंभ झाला. या तिसर्‍या टप्प्यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील आजारी नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. नवी देहली येथील एम्स रुग्णालयात सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कोरोनाची लस टोचून घेतली. मोदी यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचण्यात आली. या लसीच्या गुणवत्तेवर अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. पालिका आणि सरकार यांच्या रुग्णालयांत विनामूल्य, तर खासगी रुग्णालयांमध्ये ही लस २५० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी लस घेतल्याची माहिती ट्वीट करून देत म्हटले की, कोरोनाच्या विरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपले डॉक्टर आणि वैज्ञानिक यांनी ज्या जलद गतीने काम केले ते कौतुकास्पद आहे. भारताला कोविडमुक्त बनवूया.