वेळोवेळी अनुभूती देऊन साधनामार्गावर टिकवून ठेवल्यामुळे श्री. सुधाकर नारायण पाध्ये यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

साधनेच्या माध्यमातून आनंद देणार्‍या गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री. सुधाकर पाध्ये यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दांत येथे प्रसिद्ध करत आहोत. ​२८ फेब्रुवारी या दिवशी आपण श्री. पाध्ये यांना परात्पर गुरुदेवांकडून शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

भाग ३.

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/454909.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

​‘श्री. पाध्ये यांनी एवढेच कार्य केले नाही, तर त्यांची पत्नी सौ. अनघा पाध्ये आणि मुलगा श्री. नीलेश अन् सून सौ. जानकी, तसेच मुलगी सौ. केतकी साने या सर्वांना पूर्णवेळ साधक बनवले आहे ! यासाठी त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१३. प्रसार करतांना आलेल्या अनुभूती

श्री. सुधाकर पाध्ये

१३ अ. चौघांनाही ‘ट्रॅक्स’ चालवण्याचा सराव नसतांना गुरुकृपेने ठाणे ते अमरावती प्रवास करता येणे : मे १९९७ मध्ये मी पूर्णवेळ साधना करू लागलो आणि सप्टेंबर १९९७ मध्ये प.पू. गुरुदेवांनी मला विदर्भात प्रसारासाठी पाठवले. मी, अधिवक्ता रामदास केसरकरकाका, श्री. पानवलकरकाका आणि श्री. डी.एल्. पाटील असे चौघेजण जाणार होतो. विदर्भात जाण्याची सिद्धता झाली. आम्ही जाण्याआधी प.पू. गुरुदेवांना भेटून आलो. आम्ही ठाणे येथून ‘ट्रॅक्स’ घेऊन जाणार होतो. आम्ही प.पू. गुरुदेवांना भ्रमणभाष करून निघत असल्याचे कळवले. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी ‘चालक कोण आहे ?’, असे विचारले. ‘ठाणे येथील श्री. पंडितकाका येत आहेत’, असे सांगितल्यावर प.पू. गुरुदेवांनी विचारले, ‘‘तुम्ही सर्व चांगले चालक असतांना पंडितकाका कशाला ?’’ तेव्हा आमच्यापैकी कोणालाही ‘ट्रॅक्स’ चालवण्याचा चांगला सराव नव्हता. आम्ही ‘कार’ चालवली होती. लांबचा प्रवास होता आणि रात्रीची वेळ होती, तरीही आमच्या मनात कुठलाही विचार आला नाही. ‘आता प.पू. गुरुदेवच सर्व करवून घेणार !’ एवढेच मनात होते. नाशिक येथे रात्री निवास करून दुसर्‍या दिवशी सकाळी निघालो आणि रात्री १०.३० वाजता अमरावती येथे पोचलो.

१३ आ. अनोळखी ठिकाणीही प.पू. गुरुदेवांनी साधकांची सर्वतोपरी काळजी घेणे : रात्रभर पुष्कळ पाऊस पडत होता. अमरावतीला श्री अंबामाता मंदिरात डोंबिवलीचे कीर्तनकार आम्हाला भेटणार होते; परंतु ते भेटले नाहीत. त्यामुळे आमची झोपण्याची अडचण झाली. सगळीकडे सामसूम झाले होते. आम्ही देवळाच्या बाहेर असणार्‍या बंद दुकानांच्या फलाटांवर झोपणार होतो. एवढ्यात पनवेल येथील साधक कै. मुळ्येकाका यांनी दिलेल्या एका संपर्काच्या भ्रमणभाष क्रमांकाची आठवण झाली. मी त्यांना दूरभाष केला. श्री. पाटील यांनी आपुलकीने चौकशी केली. आमचे जेवण झाले नसेल, तर ‘तसेच घरी या’, असे सांगितले. आम्ही जेवण झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी आमची झोपण्याची व्यवस्था ते ‘चेअरमन’ असलेल्या सूत गिरणीच्या आलिशान आणि वातानुकूलित बैठककक्षात केली. तेव्हा ‘प.पू. गुरुदेव आमची किती काळजी वहात आहेत’, याची आम्हाला प्रचीती आली.

१३ इ. गुरुकार्यात स्वतःचे अस्तित्व विसरता येणे : विदर्भात प्रसाराला गेलो असतांना प्रत्येक क्षणी प.पू. गुरुदेव समवेत असल्याची जाणीव असे. तेथे ओळखी नव्हत्या. आपल्या हातानेच स्वयंपाक करून अथवा बाहेर अल्प व्यय होईल, अशा ठिकाणी जेवायचो. एकदा अकोला येथे असतांना सलग दोन दिवस प्रसार करून येण्यास उशीर झाला. खानावळी बंद झाल्यामुळे आम्हाला जेवण उपलब्ध झाले नाही. मी आणि सहसाधक श्री. दादा लोटलीकरकाका दोघे अकोल्यातील पुलावर गेलो अन् चणेवाल्यांकडून चणे घेऊन खाल्ले आणि पाणी पिऊन झोपलो. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच आम्ही तेव्हाही शांत झोपलो. विदर्भात प्रसार करतांना एक दिवसाआड आम्ही दुचाकीवरून १०० कि.मी. प्रवास करायचो; परंतु थकवा किंवा निरुत्साह जाणवत नसे. अमरावतीमध्ये एकदा प्रवचनाच्या वेळी माझी चप्पल हरवली. दुसर्‍या दिवशी घरोघरी प्रसार करण्याची सेवा होती. सकाळी ९ ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आम्ही सेवा केली. ऑक्टोबरचे कडकडीत ऊन होते. आम्ही प्रसार थांबवला, तेव्हा लक्षात आले की, माझ्या पायात चपला नव्हत्या. मी कडक उन्हात चपलेविना प्रसार करण्याचा अनुभवही घेतला. गुरुकार्यात ‘स्व’ला विसरता आले आणि गुरुदेवांची कृपा आम्ही प्रत्यक्ष अनुभवली.

१४. चिंचवड, पुणे येथे प्रसार

१४ अ. चिंचवडची सभा : विदर्भात साधारण एक वर्षभर प्रसार केला. वर्ष १९९८ मध्ये चिंचवड, पुणे येथे प.पू. गुरुदेवांची जाहीर सभा होती. तेव्हा मला चिंचवड येथील सभेच्या प्रसारासाठी सांगण्यात आले. एक मास मी रायगडमधील साधकांच्या समवेत चिंचवड येथे होतो. प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने एक मासाच्या काळात सभास्थानाच्या सभोवताली १२५ प्रवचने घेऊ शकलो. प्रत्येक इमारतीत प्रवचने झाली. सभेला २,५०० जिज्ञासू उपस्थित होते. त्यानंतर पुणे येथे सभा होत्या.

१४ आ. प.पू. गुरुदेवांनी गाडीला ‘कॅरिअर’ बसवण्यासाठी पैसे देणे : मी पनवेलला जायला निघण्यापूर्वी प.पू. गुरुदेवांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘पनवेलला जातांना येथील कापडी फलक आणि इतर साहित्य घेऊन जा.’’ त्यांनी पुढे विचारले, ‘‘तुमच्या गाडीला ‘कॅरिअर’ आहे का ? नसेल तर नवीन बसवून घ्या.’’ लगेच पुढे विचारले, ‘‘पैसे आहेत का ?’’ मी ‘नाही’ म्हटल्यावर त्यांनी पैसे दिले आणि म्हणाले, ‘‘मीसुद्धा गुरूंकडे मागायचो.’’ नंतर साधारण ७ मास मी चिंचवड येथे प्रसारास होतो.

१५. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कधीच न केलेल्या सेवा करण्यास लीलया शिकवणे आणि करवून घेणे

मला गोवा येथे दैनिक ‘सनातन प्रभात’साठी बातम्यांचा सराव करण्यासाठी जाण्यास सांगण्यात आले. तेथे प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून बातम्या सिद्ध करणे, पान लावणे आदी प्राथमिक टप्प्याची सेवा करवून घेतली. त्याच वेळी दैनिकासाठी विज्ञापने मिळणे चालू झाले होते. विज्ञापने मोठ्या प्रमाणात मिळू लागल्यावर ती पानावर लावण्यास अडचण येऊ लागली. तेव्हा दोन तीन दिवस अभ्यास करून ‘फायलींग सिस्टीम’ बनवण्याचे सुचले. मी ती कशी बनवू शकलो, हे देवालाच ठाऊक. प.पू. गुरुदेवांनीच ती सेवा माझ्या माध्यमातून करवून घेतली. त्यांच्या कृपेविना या दगडाकडून ते अशक्यच होते.

१६. त्यानंतर मला वर्ष २०१२ मध्ये रामनाथ (अलिबाग) येथे प्रसाराला जाण्याची संधी मिळाली. येथेही अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यात सहभागी झाले. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने हिंदूंचे संघटन झाले.

हे सर्व करत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी मला अनेक उदाहरणांतून स्वभावदोष आणि अहं याविषयी अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिली होती; परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करून कार्यातच गुरफटून राहिलो. त्यामुळे मी प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी प्रगती करू शकलो नाही. प.पू. गुरुदेव, मला क्षमा करा आणि आता केवळ तुमच्या चरणांशी मला तुम्हीच घेऊन चला, एवढीच प्रार्थना करतो.   ​ 

​त्यानंतर मला अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ लागला. माझे अस्तित्वच राहिले नव्हते. या वेळीही मला परात्पर गुरु पांडे महाराज यांचे नामजपादी उपाय करण्यास सांगितले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी माझा त्रास अल्प होण्यासाठी पुष्कळ त्रास सहन केला. त्यांची सेवा करण्याचीही मला संधी मिळाली. साक्षात् सगुण ईश्‍वराची सेवा, त्यांची प्रीती, त्यांचे हास्य यांतून चैतन्य मिळून माझ्यावरील आवरण निघून जात असे. हे सर्व मला केवळ आणि केवळ प.पू. गुरुदेवांमुळेच अनुभवता आले.

​‘प.पू. गुरुदेव, आपल्या कृपेमुळेच मला अनेक संतांना भेटण्याची संधी मिळाली. तुम्ही या क्षुल्लक जिवासाठी एवढे काही केले आहे की, मी एवढेच बोलू शकतो, ‘कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता !’

(समाप्त)

– श्री. सुधाकर नारायण पाध्ये, ढवळी, गोवा. (४.३.२०१९)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक