लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून भररस्त्यात पतीकडून पत्नीची हत्या

उपस्थित लोकांकडून साहाय्याऐवजी भ्रमणभाषवर घटनेचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न

  • समाजाची संवेदनशीलता नष्ट होत चालल्याचे हे द्योतक आहे. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी ‘अशा घटनेत एकमेकांना साहाय्य केले पाहिजे’, हे न शिकवल्याचा हा परिणाम आहे !
  • भररस्त्यात दिवसाढवळ्या अशी घटना घडते, यावरून उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती दयनीय आहे, हे लक्षात येते !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील मडियांव परिसरातील प्रीतीनगरात पती रफीक याने त्याची पत्नी अफसाना हिच्यावर चाकूने वार केले. ती रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिथे असलेल्या लोकांनी भ्रमणभाषवर तिचा व्हिडिओ काढला; मात्र तिच्या साहाय्यासाठी कुणीही पुढे आले नाही. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. पोलिसांनी रफीक याला अटक केली आहे.

रफीक याला अफसाना हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्याने तिला अनेकदा समजावून सांगितले होते. तिला ‘गावी जाऊ’, असेही सांगितले; पण तिने काहीही ऐकले नाही. तलाकही देत नव्हती. ‘असाच तडफडून मरशील’, असे ती म्हणाली होती’, असे रफीकने पोलिसांना सांगितले.