श्री साईबाबा संस्थान मंदिर प्रवेशाची नियमावली जाचक असल्याविषयी उच्च न्यायालयात याचिका

शिर्डी – येथील श्री साईबाबा मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंदिर परिसरातील प्रवेशाविषयी नवीन नियमावलीची कार्यवाही चालू केली आहे. या अटी जाचक असल्याचा दावा करत पत्रकार माधव ओझा यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायमूर्ती एस्.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस्.डी. कुलकर्णी यांच्या खंडपिठाने राज्यशासन आणि साई संस्थानला नोटीस दिली आहे.

याचिकेत म्हटले आहे की, नियमावलीनुसार केवळ २ पत्रकार आणि वृत्तवाहिनी प्रतिनिधी यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येईल. त्यांना ३० मिनिटांहून अधिक काळ परिसरात थांबता येणार नाही. वार्तांकन आणि चित्रीकरण करण्यासाठीची जागा साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी निश्चित करतील. अतिमहनीय व्यक्ती, मान्यवर आदींचे छायाचित्र आणि चलचित्र संस्थानच्या वतीने दिले जातील. या सर्व अटी जाचक असल्याचा आरोप करत शिर्डी येथील ‘प्रेस क्लब’ने त्याविरोधात निवेदन दिले; मात्र या निवेदनाची नोंद घेण्यात आली नसल्याने पत्रकार माधव ओझा यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. अधिवक्त्या प्रज्ञा तळेकर आणि अधिवक्ता अजिंक्य काळे यांनी त्यांची बाजू मांडली.

सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स