कुख्यात गुंड गजानन मारणे याची खुनाच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याची मुंबईपासून पुण्यापर्यंत भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीत १०० गाड्या होत्या. मारणे हा पुण्यात पोचल्यावर त्याचे शाही स्वागत करण्यात आले. गजानन मारणे याच्यावर मोक्का लावण्यात आला होता; मात्र सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली. तसे पाहिल्यास कारागृहातून बाहेर पडतांना सर्वसामान्य बंदीवानाच्या मनात समिश्र भावना असतात. समाज आपल्याला परत स्वीकारेल का ?, कुटुंबियांची प्रतिक्रिया काय असेल ?, भविष्यात पोटापाण्याचे कसे करायचे ?, यांची त्याला चिंता असते; कारण बरीच वर्षे कारागृहात राहिल्यानंतर त्याच्यासमोर उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नसते. त्यामुळे कारागृहातून बाहेर पडल्याचे समाधान जरी असले, तरी अनेक प्रश्न त्याला भेडसावत असतात; मात्र गजानन मारणे याची गोष्टच वेगळी ! एखादा भीम पराक्रम गाजवलेल्या व्यक्तीच्या तोंडावळ्यावर जशा भाव-भावना असतात, तशा भावना कारागृहातून बाहेर पडल्यावर गजानन मारणे याच्या तोंडावळ्यावर दिसत होत्या. कारागृहातून बाहेर आल्यावर तो ऐटीत गाडीत बसला आणि नंतर मिरवणुकीच्या वेळी सर्वांना अभिवादन करत पुण्याच्या दिशेने रवाना झाला. ही मिरवणूक म्हणजे एका गुंडाने व्यवस्थेला दाखवलेल्या वाकुल्या आहेत. भविष्यात बलात्कार्यांची, खुन्यांची, भ्रष्टाचार्यांची अशी मिरवणूक काढल्यास आश्चर्य वाटणार नाही.
पोलिसांची बघ्याची भूमिका !
मारणे याच्या मिरवणुकीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर पोलिसांना जाग आली आणि त्यांनी मारणे अन् त्याचे साथीदार यांना दहशत माजवल्याच्या प्रकरणी अटक केली. मारणे १०० गाड्यांचा ताफा घेऊन निघाला, त्या वेळी पोलीस कुठे होते ? मारणे याच्या समर्थकांनी ड्रोनच्या साहाय्यानेही या मिरवणुकीचे चित्रीकरण केल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच तळोजा ते पुणे या मार्गावरील एकाही टोलनाक्यावर या ताफ्यातील गाड्यांनी टोल भरला नसल्याचेही समोर आले आहे. एरव्ही सामान्य नागरिकांकडून भरमसाठ टोल वसूल करणार्यांकडून मारणे याला जाब विचारण्याचे धारिष्ट्य झाले नसावे. यावरून पुन्हा एकदा नियम, कायदे हे कवळ सामान्य जनतेसाठीच असतात. महनीय व्यक्तींसाठी ते नसतात आणि त्याही पुढे जाऊन मारणे याच्यासारखे गुंड आणि त्याचे साथीदार यांच्याकडे जर अशा टोलची मागणी केली, तर आपले काय होईल, याची पुरेपूर जाणीव टोलनाक्यांवरील कर्मचार्यांना असल्यामुळे ते अशांकडे टोल मागण्याचे धारिष्ट्यही करत नाहीत. असो. महत्त्वाचे म्हणजे मारणे याने १०० गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढेपर्यंत पोलीस झोपले होते का ? त्या वेळी मोठमोठ्याने आरडाओरडा करणार्या, जोरात गाड्या चालवणार्या समर्थकांमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होत आहे, हे पोलिसांच्या लक्षात आले नाही का ? दबाव वाढल्यानंतर, विरोध झाल्यानंतर पोलिसांकडून तोंडदेखली कारवाई होते. मारणे आणि त्याचे समर्थक यांच्याकडून दहशत माजवली जात असतांनाच घटनास्थळी पोचून पोलिसांनी ती रोखली असती, तर त्याचा जनतेवर सकारात्मक परिणाम झाला असता.
दहशत माजवण्याइतपत गुंडांकडे एवढे धारिष्ट्य येते कुठून ? कारागृहाच्या बाहेर पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे गुंड मिरवणूक काढतात, हे पोलिसांचे अपयश आहे. आपण चुकीचे, नियमबाह्य वर्तन केल्यास शिक्षा होईल, याचे भय गुंडांना राहिलेले नाही. ही मिरवणूक म्हणजे एका गुंडाने केलेले शक्तीप्रदर्शन होते. पोलिसांना, प्रशासनाला आणि जनतेला स्वतःची शक्ती दाखवून त्यांच्या मनात दहशत बसवण्यासाठी केलेला प्रयत्न होता. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रयत्न बर्याच प्रमाणात यशस्वी झाला, असेच म्हणावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे खुनाच्या प्रकरणात मारणे सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटला. या प्रकरणात पोलिसांना न्यायालयाला पुरावे का सादर करता आले नाहीत ? एका नामचीन गुंडाला पुरेशी शिक्षा होण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपुरे का पडले ? यात दोष कुणाचा ? जर पोलिसांनी योग्य प्रकारे अन्वेषण करून पुरावे सादर केले असते, तर मारणे कारागृहात असता. मारणे याच्या मिरवणुकीची चर्चा होत असतांना पोलिसांच्या या अपयशाचीही चर्चा व्हायला हवी. मागील काही वर्षांत मारणे याच्यासह अनेक टोळीतील गुंडांची अशा प्रकारे सुटका झाली असून पुन्हा एका टोळीयुद्धाचे सावट पुण्यावर घोंगावू लागले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोकादायक असलेल्या मारणे याच्यासारख्या गुंडांचा बंदोबस्त पोलीस कसा करणार ?
मिरवणुकीचा मतीतार्थ !
पुण्यात जमिनींना सोन्याचा भाव येऊ लागल्यावर जमीन मालक आणि जमीन विकत घेणारे यांच्यात मध्यस्थाची भूमिका पार पडण्यासाठी अनेक टोळ्या जन्माला आल्या. त्यांतीलच एक गजानन मारणे याची टोळी. जमिनीचे व्यवहार स्वतःच्या टोळीला अधिकाधिक मिळावेत, यासाठी या टोळ्यांमध्ये स्पर्धा लागली. त्यातूनच या टोळ्यांतील सदस्यांच्या हत्या होऊ लागल्या. अशाच हत्येच्या प्रकरणात मारणे याच्या विरोधात मोक्का लागू करण्यात आला होता. त्यात तो सुटला. हत्या करणे, खंडणी मागणे हेच त्याचे कर्तृत्व ! लोकांना अशा गुंडांना डोक्यावर घ्यावेसे वाटते, हे चिंताजनक आहे. त्याच्या स्वागतासाठी ५०० समर्थक घराबाहेर पडले. आणखी छुपे समर्थक किती असतील, याचा विचारही न केलेला बरा ! मारणे याची मिरवणूक काढणारे बहुतांश तरुण होते. यावरून गुंडांना मारणारे, त्यांना गजाआड करणार्या पोलिसांविषयी नव्हे, तर खून करणारे, तलवारी घेऊन रस्त्यावर फिरून दहशत माजवणारे, खंडणी मागणार्या गुंडांविषयी तरुणांच्या मनात क्रेझ आहे, हेच स्पष्ट होते. समाजातील एका मोठ्या घटकाचा आदर्शच जर गुन्हेगार असतील, तर अशा समाजाचे अधःपतन निश्चित आहे.
गुंडांना धूधू धुणारे पोलीस हे केवळ चित्रपटांपुरते सीमित आहेत. जेव्हा वास्तवातही असे पोलीस समाजात निर्माण होतील, त्या वेळी समाजात त्यांच्याही मिरवणुका निघतील अन्यथा खलनायकांचे उदात्तीकरण होतच राहील !