पुण्यातील मेट्रो सेवा कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने दिले ३६७ कोटी रुपये !

पुणे – चालू आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटामुळे मेट्रोला निधी देण्यात आला नव्हता; परंतु पुढील ४ ते ६ मासांमध्ये मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित केला जाणार आहे. पिंपरी आणि पुणे येथील प्राधान्य मार्गावर मेट्रोच्या अपुर्‍या कामांसाठी निधी अल्प पडू नये; म्हणून ३६७ कोटी रुपये निधी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) प्रकल्पासाठी राज्य सरकारने दिला आहे. या प्रकल्पात राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा आहे.

 

माजी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षअखेरीस पुणे मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. या वेळी त्यांनी पिंपरी आणि पुण्यातील मेट्रोची कामे चालू असणार्‍या ठिकाणी भेट देऊन या कामांसाठी कोणत्याही स्वरूपात निधीची चणचण पडणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अर्थसंकल्पातील तरतुदींच्या अनुमाने ७५ टक्के निधी देण्याचा निर्णय नगरविकास विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.