चीन अतिशय खुश आहे !

पँगाँग तलावाजवळून भारत आणि चीन सैन्यांच्या माघारीवरून डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची टीका

नवी देहली – वर्ष २०२० मध्ये पंतप्रधानांनी म्हटले होते, ‘कुणीही आले नाही, कुणी गेले नाही.’ चीनला हे खूप आवडले होते; पण हे सत्य नव्हते. नंतर सैन्यदलप्रमुख नरवणे यांना आदेश दिले गेले की, त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रणरेषा पार करून पँगाँग सरोवर कह्यात घ्यावा, जेणेकरून चिनी चौक्यांवर लक्ष ठेवता येईल. आता आपण तेथून पाठीमागे येत आहोत; पण डेपसांगमधून चीन पाठीमागे जाण्याचे काय झाले ? आतापर्यंत हे झालेले नाही. त्यामुळे चीन खूपच खुश आहे, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

पँगाँग तलावाजवळून भारत आणि चीन यांनी सैन्य मागे घेण्यास मान्य केल्याच्या घटनेवर डॉ. स्वामी यांनी वरील ट्वीट केले.  

डॉ. स्वामी यांच्या या ट्वीटवर एका व्यक्तीने ट्वीट करत विचारले, ‘या घडामोडींवर तुमचा अंदाज काय ?’ त्यावर डॉ. स्वामी यांनी उत्तर दिले, ‘सध्याच्या स्थितीत सैन्य माघारी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्मसमर्पण करण्यासारखेच आणि चीनला खुश करणारे आहे. चैबरलेन याने हिटलरला शांती चर्चेतून खुश केले होते. जेव्हा आपण सैनिकीदृष्ट्या सामर्थ्याने सज्ज असू, तेव्हा एकच घोषवाक्य हवे, ‘चीन सैन्याला हाकला.’ तोपर्यंत कोणतीही चर्चा नको. केवळ चलनाची देवाणघेवाण होऊ शकेल.