एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करता सवा पाच कोटी रुपये देयक पाठवणार्‍या पुणे येथील स्पर्श रुग्णालयावर कारवाई करावी !

पुणे – एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करता सवा पाच कोटी रुपये देयक पाठवणार्‍या स्पर्श रुग्णालयाला देयक देण्यात येऊ नये, तसेच हे देयक देणारे कोविड सेंटरचे चालक आणि स्पर्श रुग्णालयाचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांच्यावर महापालिकेची फसवणूक केल्याविषयी फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगर विकासमंत्री यांनाही त्यांनी मागणीचे निवेदन पाठवले आहे.

स्पर्श रुग्णालयाचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे

लांडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सेंटरसाठी महापालिकेने करारच केला नसतांना आणि एकाही रुग्णावर उपचार झाले नसतांना हे देयक मागणे ही महापालिकेची शुद्ध फसवणूक आहे. शहरातील प्रामाणिक कर भरणार्‍या जनतेच्या पैशावर दरोडा टाकण्याचा हा डाव आहे. सध्याच्या स्थायी समितीची मुदत या महिनाअखेर संपत असल्यामुळे समितीकडून देयकाला संमती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.