हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

भाजपकडून शरजील उस्मानी याच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट

देवेंद्र फडणवीस

मुंबई – हिंदु समाजाला ‘सडलेला’ म्हणणारा शरजील उस्मानी हा सडक्या डोक्याचा आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत उस्मानी याने हिंदु समाजाविषयी केलेल्या अवमानजनक, आक्षेपार्ह आणि गंभीर वक्तव्यांची त्वरित नोंद घेऊन त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी. महाराष्ट्रात मोगलांचे राज्य चालू आहे का ? हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? या परिषदेला अनुमती देणेच चुकीचे होते. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते. ही परिषद आयोजित करणार्‍यांवर, तसेच शरजीलवर कारवाई झाली नाही, तर ही सरकारशी मिलीभगत आहे,  असे आम्ही समजू, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

 (सौजन्य : Lokmat)

एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो अन् त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्‍चर्यकारक असून सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे, असेही फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे.

शरजील उस्मानी

शरजील उस्मानी याच्या विरोधात तक्रार नोंद

मुंबई – शरजील उस्मानी याचे हे वक्तव्य पूर्णपणे देशविघातक असून त्याच्या विरोधात सामाजिक भावना दुखावण्यासह देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

एल्गार परिषदेच्या आडून जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव वाटतो. वर्ष २०१७ मध्ये एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल झाली होती. एल्गार परिषदेतील त्याच्या भडकावू आणि देशविघातक भाषणाचे चित्रण अन् सर्व पुरावे पोलिसांकडे असतांनाही त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आलेली नाही. कुणाच्याही दबावाखाली न येता शरजील याला तात्काळ अटक करावी, अशी मागणही भातखळकर यांनी केली आहे.