Indian Origin Ministers In Canada Cabinet : कॅनडाच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाच्या दोन महिला खासदारांचा समावेश !

भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद आणि कमल खेरा

ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद आणि कमल खेरा या दोन महिलांकडे मंत्रीपदाचे दायित्व सोपवण्यात आले आहे. ५८ वर्षीय अनिता आनंद यांची नाविन्यता, विज्ञान आणि उद्योग मंत्री म्हणून, तर ३६ वर्षीय कमल खेरा यांना आरोग्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत कमल खेरा आणि अनिता आनंद ?

कॅनेडीयन पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरील नोंदींनुसार, देहलीत जन्मलेल्या कमल खेरा या कॅनडाच्या संसदेत निवडून येणार्‍या सर्वांत तरुण खासदारांपैकी एक आहेत. वर्ष २०१५ मध्ये त्या पहिल्यांदा ब्रॅम्प्टन वेस्टमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. नोव्हा स्कॉशियामध्ये जन्मलेल्या आणि तिथेच बालपण गेलेल्या अनिता आनंद जस्टिन ट्रूडो यांनी त्यागपत्र दिल्यानंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होत्या. अनिता आनंद वर्ष २०१९ मध्ये पहिल्यांदा ओकव्हिलच्या खासदर झाल्या. त्यांनी याआधी राष्ट्रीय संरक्षण मंत्री, सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री म्हणून काम केलेले आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेपाठोपाठ कॅनडामधील नव्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश होणे, हे भारताचे जगातील स्थान भक्कम होत असल्याचे द्योतक !