कर्नाटक : तुमकुरू रेल्वे स्थानकाला ‘सिद्धगंगा श्रीं’ यांचे नाव देण्याविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून टाळाटाळ – केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा

केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांचा आरोप

डावीकडून केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या

तुमकूर (कर्नाटक) – तुमकूरच्या रेल्वे स्थानकाला सिद्धगंगा मठाचे डॉ. श्री शिवकुमार स्वामी (सिद्धगंगा श्री) यांचे नाव देण्यासाठी केंद्रशासनाने संमती देऊन ५ महिने झाले, तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी केला.

केंद्रीय राज्यमंत्री व्ही. सोमण्णा पुढे म्हणाले की,

१. लाखो गरीब मुलांना अन्न, वस्त्र आणि निवारा देऊन त्यांच्या जीवनाला दिशा देणार्‍या ‘सिद्धगंगा श्रीं’ यांचे नाव तुमकूर रेल्वे स्थानकाला देण्याविषयी केंद्राकडून आलेल्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. हे योग्य नाही.

२. मी स्वतः जाऊन मुख्यमंत्री आणि सरकारचे मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आहे. तरीही केंद्र सरकारच्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास ते सिद्ध नाहीत. राज्य आणि केंद्र सरकार यांनी एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे काम केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्वरित केंद्राच्या पत्रावर स्वाक्षरी करून तुमकूर रेल्वे स्थानकाला सिद्धगंगा श्रींचे नाव देण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करावी.

३. शहरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ९० कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. लोकांनी आम्हाला मतदान करून निवडून दिले आहे. लोकांनी दिलेल्या मतांना बांधील राहून काम केले पाहिजे, हे कुठल्याही राजकारण्याने विसरू नये.