Terrorist Abu Qatal Shot Dead : पाकिस्तानमध्ये आतंकवादी हाफीज सईद याच्या पुतण्याची अज्ञाताकडून हत्या

गोळीबारात हाफीज सईदही घायाळ झाल्याचे वृत्त

आतंकवादी हाफीज सईद (डावीकडे) याचा पुतण्या अबू कताल उपाख्य कताल सिंधी (उजवीकडे)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आतंकवादी हाफीज सईद याचा पुतण्या अबू कताल उपाख्य कताल सिंधी याची १५ मार्च या दिवशी अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केली. ही हत्या कुणी घडवून आणली ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कताल हा जम्मू-काश्मीरमधील अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी होता.  झेलम येथे अबू कतालवर गोळीबार झाला, त्या वेळी हाफीज सईददेखील त्याच्यासमवेत होता. या गोळीबारात तोही घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या वर्षी ९ जून या दिवशी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिव खोडी मंदिरातून परतणार्‍या भाविकांच्या बसवर कताल यानेच आतंकवादी आक्रमण घडवून आणले होते. यात काही भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी १ जानेवारी २०२३ या दिवशी राजौरी जिल्ह्यातील धनगरी गावात करण्यात आलेल्या आक्रमणात कताल याचा सहभाग होता. अबू कताल लष्कर-ए-तोयबामध्ये आतंकवाद्यांची भरती करण्याचे काम करत होता.