|

देहू (पुणे) – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हा शब्द मी देतो. धर्माचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या नद्यांचे रक्षण करणे, हेही आपलेच दायित्व आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांना तुकोबांचे मार्गदर्शन लाभले. त्यानां त्यांचा आशीर्वाद होता. देहूच्या पवित्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकोबांच्या भेटीला आले होते. संत तुकोबांच्या रचना आपल्या जगण्यावर भाष्य करतात. पुढील ३७५ वर्षेच नव्हे, तर ३ सहस्र ३७५ वर्षे या रचनांमधील अर्थ लोप पावणार नाही.’’ (हेच तर संतांचे आणि अध्यात्माचे महत्त्व आहे. यामुळेच सहस्रावधी वर्षे झाली, तरी ऋषीमुनी सश्रद्ध हिंदु जनतेसाठी आजही पूजनीय आहेत आणि पुढेही रहातील. – संपादक)
तुकाराम बीजनिमित्त लाखो वारकरी देहूमध्ये आले आहेत. पंढरपूर वारीच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी वारकर्यांच्या सेवा, सुविधा यांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि ‘निर्मल वारी, हरित वारी’ संकल्पनेत दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन त्यांना देहू संस्थानाकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे..