महाराष्ट्रात ‘सी.एम्. डॅशबोर्ड’ यंत्रणा चालू !

  • शासनाच्या सर्व विभागांची अधिकृत आणि अद्ययावत माहिती होणार उपलब्ध !

  • सरकारी योजनांच्या सद्य:स्थितीचे मूल्यमापन समजणार !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्यशासनाने ‘सी.एम्. डॅशबोर्ड’ ही नवी यंत्रणा चालू केली असून शासनाच्या सर्व विभागांची अधिकृत आणि अद्ययावत माहिती यावर उपलब्ध होईल. पंतप्रधान आवास योजना, आरोग्य योजना यांसारख्या सर्व योजनांची तालुका-मंडल स्तरापर्यंत काय स्थिती आहे, याची माहिती याद्वारे मिळू शकणार आहे. यासाठी ‘गोल्डन डेटा’ (अतीमहत्त्वाची माहिती) यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यात अधिकृत माहिती देणार्‍या खात्याची नोंद केली जाईल. या माहितीनुसार विश्‍लेषण करून कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

एखाद्या माहितीसाठी कोणते खाते सर्वांत योग्य हे सुनिश्‍चित करणार !

राज्य शासनाकडे जेवढी माहिती उपलब्ध असते, तेवढी कुठेच नसते; पण दोन खाती एकमेकांशी संवाद साधत नाहीत आणि एकाच माहितीचे आकडे वेगवेगळे देतात किंवा यात तफावत आढळते. त्यामुळे कोणत्याही माहितीसाठी ‘अधिकृत प्राधिकारी (मुख्य स्रोत)’ कोण हे ‘गोल्डन डेटा’ यंत्रणेत ठरवण्यात आले आहे.

विविध सरकारी खात्यांकडून सरकारी योजनांच्या कार्यवाहीचे मूल्यमापन करण्यात येणार !

महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोचतो का, याचे सूक्ष्म मूल्यमापन करण्यासाठी आणि साधनसंपत्ती योग्य प्रकारे व्यय करण्यासाठी सरकारने १०० दिवसांचा कार्यक्रम घोषित केला असून राज्यभरातील १० सहस्र कार्यालयांमध्ये त्याची कार्यवाही कशी केली जात आहे, याचे मूल्यमापन करण्याचे काम ‘क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया’सारख्या त्रयस्थ यंत्रणेला देण्यात आले आहे. किमान गुण पातळी किंवा निकष ठरवण्यात आले असून ती न गाठणारी कार्यालये अनुत्तीर्ण होतील. पुढे त्यांना दंड करण्यात येईल आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यात येईल.

संपादकीय भूमिका

राज्यशासनाची ही यंत्रणा स्वागतार्ह आहे. याने एकूणच सरकारची फलनिष्पत्ती वाढण्यास साहाय्य होईल, यात संशय नाही; परंतु मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने, तसेच मराठीला सरकारकडूनच प्रथम प्रोत्साहन मिळणे अपेक्षित असतांना ‘सी.एम्. डॅशबोर्ड’ या इंग्रजी नावाच्या जागी ‘मुख्यमंत्री दृश्यपटल’, ‘शासनदर्पण’, ‘सुव्यवस्था मंच’ यांसारख्या मराठी पर्यांयाचा विचार झाल्यास ते अधिक साजेसे होईल, असेच मराठीजनांना वाटते !