इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण केले आहे. या आक्रमणात पाक सैन्याच्या बसगाड्यांना लक्ष्य करण्यात आले. आत्मघातकी आक्रमणाद्वारे २ बस गाड्या स्फोट घडवून उडवून देण्यात आल्या. यात पाकचे ९० सैनिक ठार झाल्याचा दावा या आर्मीकडून करण्यात आला आहे. भारतात वर्ष २०१९ मध्ये पुलावामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर जसे आक्रमण करण्यात आले, तसेच हे आक्रमण होते.
१. बलुचिस्तानमधील नोश्की येथे सुरक्षादलाच्या ७ बस आणि २ गाड्या यांवर हे आक्रमण करण्यात आले. पाकिस्तानी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आक्रमणात ५ सैनिकांचा मृत्यू झाला असून १३ सैनिक घायाळ झाले आहेत.
२. आक्रमणानंतर बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले आहे की, आमच्या मजीद ब्रिगेडने काही घंट्यांपूर्वी नोश्की येथे आर्सीडी महामार्गावर रखशान जवळ सैन्याच्या बस गाड्यांवर आत्मघाती आक्रमण केले. या ताफ्यात ८ बसगाड्या होत्या. यातील एक बस स्फोटात पूर्णपणे नष्ट झाली आहे. यानंतर आमच्या सदस्यांनी लगेचच एका बसला पूर्णपणे घेरले आणि बसमधील सर्व सैनिकांना एक एक करून ठार मारले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यातील मृतांची संख्या ९० झाली आहे.