सिक्कीम सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी चोपले !

हाणामारीत चीनचे २०, तर भारताचे ४ सैनिक घायाळ !

चीनच्या वाढत्या कुरापती पहाता चीनविरोधात भारताने थेट सैनिकी कारवाई करून अक्साई चीन आणि लडाख पुन्हा स्वतंत्र केला पाहिजे ! भारतीय सैन्याचे मनोबळही उंचावलेले असल्याने चीनला ते नक्कीच भारी पडतील, यात भारतियांना शंका नाही !

गंगटोक (सिक्कीम) – लडाखच्या गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षाप्रमाणे भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये सिक्कीम येथील सीमेवर झालेल्या संघर्षात चीनचे २० सैनिक, तर भारताचे ४ सैनिक घायाळ झाले. या घटनेला भारतीय सैन्यानेही दुजोरा दिला आहे. नेहमीप्रमाणे चीनच्या सैन्याने येथे भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैनिकांनी त्यास विरोध केला. त्यामुळे दोन्हीकडील सैनिकांमध्ये हाणामारी झाली. त्यात भारतीय सैनिकांनी चीनच्या सैनिकांचा डाव उलटवून लावला. उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे गेल्या आठवड्यात ही घटना घडली. सध्या या भागात तणावपूर्ण स्थिती असून भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार चर्चेद्वारे हा वाद सोडवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. (चीन कधीतरी सीमावाद चर्चेद्वारे सोडवू शकतो का ? त्याच्यावर कधीतरी विश्‍वास ठेवता येईल का ? – संपादक) विशेष म्हणजे वर्ष २०२० च्या ९ मे या दिवशीही याच ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली होती.

 (सौजन्य : India Today)

१. उत्तर सिक्कीमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असतांनाही भारतीय सैनिकांनी चीनच्या सैनिकांना पिटाळून लावले. त्यामुळे पुन्हा ते चीनच्या सैनिकांना भारी पडलेले आहेत. भारतीय सैन्याचे चीन सैन्याच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२. दुसरीकडे गलवान येथील सीमावाद अद्याप सुटलेला नाही. ९ फेर्‍यांच्या चर्चेनंतरही काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. सिक्कीममधील या घटनेमुळे आता लडाखमध्येही तणाव वाढू शकतो.