नंदुरबार येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून पोलिसांकडून ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई केली, तर धर्मांधांकडून गंभीर परिणाम होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असा विचार करून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलीस कर्णकर्कश आवाजात लावण्यात येणार्‍या या भोंग्यांवर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! न्यायालयाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन करून अजान देणार्‍या भोंग्यांवरही कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !

नंदुरबार – १४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी छतावर डीजे आणि ध्वनीक्षेपक लावला म्हणून शहरातील दादा गणपति परिसरातील गौरव सोनार, विशाल जगदाळे, ओम सोनार, प्रवीण तिडके आणि कालू नेतलेकर या ५ जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम २६८, २६९, २९०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (३) चे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

१. ‘संक्रांत, होळी, शिवजयंती, श्री गणेश चतुर्थी आणि अनंतचतुर्दशी अशा हिंदूंच्या विशिष्ट  सणांच्या वेळी लागू केले जाणारे कायदे, नियम अन्य धर्मियांना का लागू केले जात नाहीत ?’ असा प्रश्‍न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

२. विशिष्ट जयंतींच्या वेळी उशिरापर्यंत मिरवणुका काढण्याची मुभा दिली जाते. मोहरम आदी प्रसंगी निघणार्‍या मिरवणुकांनी तर नंदुरबारमध्ये विक्रम स्थापित केला आहे.

३. अशा वेळी काटेकोर कायदे, नियम राबवणारे पोलीस याची नोंद घेत नाहीत, हा नंदुरबारकरांचा अनुभव आहे.

४. ‘मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे वर्षातून एकदा मोठ्या आवाजात वाजणारा डीजे पोलिसांना ऐकू येतो, मग वर्षातील ३६५ दिवस प्रतिदिन अजान देणारे भोंगे पोलिसांना ऐकू येत नाहीत का ?’ असा संतप्त प्रश्‍न शहरातील युवकांनी उपस्थित केला आहे.