Islamic Revolutionary Army : बांगलादेशाचे सरकार बनवत आहे जिहादी आतंकवादी संघटना !

बांगलादेशातील वरिष्ठ पत्रकाराने दावा केल्याचे ‘झी न्यूज’चे वृत्त

नवी देहली – बांगलादेशामध्ये हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर नवीन माहिती समोर आली आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकार स्वतःची आतंकवादी संघटना सिद्ध करत आहे, असा दावा बांगलादेशाच्या एका वरिष्ठ पत्रकाराने केला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे; मात्र यात या वरिष्ठ पत्रकारांचे नाव देण्यात आलेले नाही. या संघटनेला ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी आर्मी’ (आय.आर्.ए.) असे नाव देण्यात आले आहे. ही आतंकवादी संघटना इराणच्या ‘इराण रिव्होल्युशनरी गार्ड’च्या धर्तीवर सिद्ध केली जाणार असून हिजबुल्ला आणि हुती आतंकवाद्यांप्रमाणे त्यातील आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कथित विद्यार्थी नेत्यांच्या हातात हिची सूत्रे असतील, असे सांगितले जात आहे. या संघटनेच्या स्थापनेसाठी १०० कोटी रुपयांचा निधीही संमत करण्यात आला आहे. त्यासाठी ‘ऑपरेशन ऑक्टोपस’ नावाची योजनाही सिद्ध करण्यात आली आहे.

कशी उघड झाली योजना ?

कराचीहून एक पाकिस्तानी नौका बांगलादेशाच्या चितगाव बंदरावर पोचली. या नौकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके होती. त्याची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. ही स्फोटके कंबोडियाच्या आस्थापनाने बनवली आहेत. बांगलादेशाच्या नौदलाने या नौकेला रोखले होते; पण सरकारकडून आदेश आल्यानंतर नौकेला चितगाव बंदरावर जाऊ देण्यात आले.

अमली पदार्थांच्या तस्करीतून उभारणार पैसा !

‘झी न्यूज’च्या वृत्तानुसार ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या कट्टरतावादी संघटनांचा वापर आतंकवाद्यांच्या भरतीसाठी केला जाईल. सर्वप्रथम मदरशांमधून अल्पवयीन तरुणांची भरती केली जाईल; मग महाविद्यालये आणि विद्यापीठ यांंमधून शिकलेल्या तरुणांची भरती केली जाईल. सध्या १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असला, तरी पुढे आतंकवादी कारवाया करण्यासाठी पैशांची व्यवस्था करण्याची योजनाही सिद्ध आहे. हा पैसा अमली पदार्थांच्या तस्करीतून येणार आहे, ज्यासाठी पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) आणि सरकार यांनी पुरवठा मार्ग सिद्ध केला आहे. यात मलाक्काच्या सामुद्रधुनीतून पाकिस्तानातून बांगलादेशात अमली पदार्थ येतील. बांगलादेशातून ते फिलिपाइन्स आणि त्यानंतर रशियामार्गे जपानमध्ये पोचेल. पाकिस्तानकडून दुसरा मार्ग सिद्ध करण्यात आला आहे. पाकिस्तानातून औषधे दक्षिण आफ्रिकेत जाणार आहेत. तेथून मेक्सिकोमार्गे अमेरिका आणि युरोप येथे अमली पदार्थ पोचवण्याची सिद्धता करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील अंतरिम सरकारचा आतापर्यंतचा कारभार पहाता अशा प्रकारची संघटना स्थापन केली जात असेल, तर आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही ! पाकिस्तानकडून गेली ३५ वर्षे अनेक जिहादी आतंकवादी संघटना चालवून भारतात आतंकवादी कारवाई केल्या जात आहेतच !