मये येथील ग्रामस्थांना सनद देण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची डिचोलीच्या जिल्हाधिकार्‍यांना सूचना

डॉ. प्रमोद सावंत

डिचोली, १२ जानेवारी (वार्ता.) – मये येथील स्थलांतरित मालमत्तेच्या प्रकरणाची नोंद घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ग्रामस्थांना सनद आणि मालमत्तेचा मालकी हक्क देण्याची प्रक्रिया मार्गी लावावी, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे.

याविषयी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर म्हणाले, ‘‘उत्तर गोवा जिल्हा कार्यालयातील ज्येष्ठ अधिकारी आर्. मनेका आणि गोपाळ पार्सेकर यांच्या साहाय्याने डिचोली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाने मये येथील ग्रामस्थांना मालमत्तेचा अधिकार देण्याची प्रक्रिया चालू केली आहे. यासाठी आलेल्या ८१० अर्जांपैकी ८० जणांच्या अर्जांच्या संदर्भात कार्यवाही करण्यात आली आहे. मये ग्रामस्थांना हक्क देण्याच्या या प्रक्रियेकडे शासन दुर्लक्ष करत आहे. या कारणावरून येथील मये भूविमोचन नागरिक समितीने आंदोलन करण्याचे ठरवले होते; परंतु नंतर मुख्यमंत्र्यांनी या समितीच्या सदस्यांशी चर्चा केली आणि हा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. यामुळे हे आंदोलन रहित करण्यात आले. गेल्या आठवड्यापासूनच डिचोली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ही प्रक्रिया चालू केली आहे. मये भूविमोचन नागरिक समितीचे अध्यक्ष राजेश कळंगुटकर, सखाराम पेडणेकर, कालिदास कवळेकर, काशीनाथ मयेकर, यशवंत कारभाटकर, हरिश्‍चंद्र च्यारी आणि इतर नागरिकांनी शासनाच्या या कृतीचे स्वागत केले आहे, तसेच आमदार प्रवीण झांट्ये यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून हा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यात येणार, असे सांगितले.