अग्नीशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव कार्यालयातून पुढे गेला नसल्याचे उघड

भंडारा येथील रुग्णालयातील आगीत बालके दगावल्याचे प्रकरण

भंडारा – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अग्नीशमन यंत्रणा खरेदी करण्यासाठी दीड कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरी नसल्याचे ‘लोकमत’ या वृत्तपत्रात म्हटले आहे. संचालक डॉ. तायडे यांनी संबंधित प्रस्तावावर स्वाक्षरी करून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक अनुमती घेऊन पाठवण्याविषयीचे पत्र मागील वर्षी नोव्हेंबर मासात आरोग्य सेवा नागपूर मंडळाच्या उपसंचालकांना पाठवण्यात आले होते. या पत्राच्या आधारे अंदाजपत्रकातील त्रुटी दूर करून परत प्रस्ताव पाठण्यात आला; परंतु तो संचालक कार्यालयात पोचला नाही, असे समजते.

‘इनक्युबेटर’

१. या रुग्णालयात ‘स्मोक डिटेक्टर’ आणि ‘फायर फायटिंग’ या उपकरणे असती, तर हानी अल्प झाली असती, असेही सूत्र आता पुढे येत आहे.

२. या रुग्णालयातील ‘सिक न्यूबॉर्न केअर युनिट’ या अतीसंवेदनशील कक्षात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय असणे अपेक्षित असते. बालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नर्स असते. ‘इनक्युबेटर’जवळ नर्स असणे बंधनकारक असतांना ही घटना घडली तेव्हा नर्स या कक्षात नसल्याची माहिती पुढे येत आहे.

३. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात पुष्कळ धूर पसरल्यावर एका परिचारिकेच्या रात्री २ वाजता लक्षात आले. त्या ठिकाणी एकही कर्मचारी नव्हता.

४. ‘इनक्युबेटर’मध्ये ठेवण्यात आलेल्या काही मुलांच्या काचा काळ्या पडल्या होत्या, याचा अर्थ आग लागून बराच वेळ झाला होता.

५. आग ‘शॉर्टसर्किट’मुळे लागल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निगराणी ठेवली जात होती कि नाही, असाही प्रश्‍न निर्माण होत आहे.