कोल्हापूर, ७ जानेवारी (वार्ता.) – कोरोना काळातील वीजदेयके माफ करावीत, या मागणीसाठी येथे भव्य वाहन मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये २५० हून अधिक रिक्शा, २०० हून अधिक ट्रक आणि खासगी गाड्या सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूरमध्ये आजपर्यंत निघालेल्या वाहन मोर्च्यामध्ये हा सर्वाधिक भव्य मोर्चा होता. ‘सरकारला यातून शहाणपण यावे’, असे आंदोलकांनी म्हटले असून ‘लवकरात लवकर वीजदेयक माफ करण्यात यावे; अन्यथा राज्यभरात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल’, अशी चेतावणी मोर्चेकर्यांनी दिली आहे. ‘आम्ही वीजदेयक भरणार नाही कृती समिती’च्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.
शहरात ज्या ज्या मार्गावरून मोर्चा गेला, त्या त्या प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनकोंडी झाली होती. एकाच वेळी शहरात इतक्या मोठ्या संख्येने ट्रक, टेम्पो, खासगी बस रस्त्यावर आल्याने वाहतूक शाखेची तारांबळ उडाली. कोल्हापूरकरांनी एखादे आंदोलन हातात घेतल्यास ते तडीस नेतात. यापूर्वी सरकारला अनेक निर्णय पालटण्यास भाग पाडले आहेत. त्यामुळे आता सरकार वीजदेयकावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.