रडीचा हिंसक डाव !

लहान मुलांच्या खेळामध्ये जर एका गटाविरुद्ध दुसरा गट पराभूत होऊ लागला, तर तो दुसरा गट पराभव जिव्हारी लागत असल्याचे कोणतेतरी नियमबाह्य कृत्य करून कृतीतून दाखवून देतो, हे आपण अनेकदा पाहिले असेल. याला आपण रडीचा डाव म्हणतो. तो लहान मुलांचाच खेळ असल्याने त्यांच्या या वृत्तीकडे फारसे गांभीर्याने कुणी घेत नाही आणि त्यांच्या कृतीकडेही करमणूक म्हणून पाहिले जाते. तथापि असाच प्रकार जेव्हा मोठ्यांच्या संदर्भात होतो, तेव्हा काय होते, हे अमेरिकेतील संसदेत रिपब्लिकन पक्षाच्या सहस्रो गुंडांनी घातलेल्या धुडगुसावरून दिसून येईल. लोकशाहीचा टेंभा मिरवणार्‍या आणि जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या सहस्रो गुंडांनी संसदेत घुसून जो हिंसाचार घडवून आणला, त्याने अमेरिकेची मान लज्जेने खाली गेली. या हिंसक कृत्याचे प्रणेते अर्थात्च रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन हे २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीची अधिकृत घोषणा संसदेत होणार होती. त्या वेळी निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागलेल्या रिपब्लिकन पक्षातील ट्रम्प समर्थकांनी लोकशाहीचे प्रतीक समजल्या जाणार्‍या वॉशिंग्टन डी.सी. मधील कॅपिटॉल इमारतीत घुसून हिंसाचार घडवून आणला. या हिंसाचाराने ४ जणांचा बळी घेतला, तर अनेक जण घायाळ झाले. हा तमाशा तब्बल ५ घंटे चालू होता. या वेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली. हिंसक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर बंदुका रोखल्या. दुसरीकडे संतप्त जमावापासून जीव वाचवण्यासाठी सीनेट सदस्य आपापल्या बाकाच्या खाली लपून बसले होते. असे चित्र अमेरिकेत बहुधा प्रथमच पहायला मिळाले असावे. ही घटना म्हणजे अमेरिकेला गृहयुद्धाच्या रूपातील जोरदार झटका म्हणावा लागेल, जो आपण आपल्या देशात अनेकदा अनुभवत असतो. आजच्या हिंसाचाराचे खापर सर्वांनी मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडले. ट्रम्प यांच्या चिथावणीखोर भाषणानंतरच हा हिंसाचार झाल्याचा आरोप माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला, तर बायडेन यांनी हे देशविरोधी कृत्य असल्याचे म्हटले. परिणामी टि्वटरने ट्रम्प यांचे खाते १२ घंट्यांसाठी ‘ब्लॉक’ केले. पाठोपाठ फेसबूक आणि यूट्यूबनेही ट्रम्प यांचे काही व्हिडिओ हटवले. अमेरिकेच्या इतिहासात देशाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या संदर्भात प्रथमच असा प्रकार घडला. वास्तविक आजच्या हिंसेचे संकेत ट्रम्प यांच्या मागच्या एका वक्तव्यात दडलेले आढळते. मतमोजणी होऊन ट्रम्प यांचा पराभव झाल्याचे कळताच त्यांनी आपण अमेरिकेची सत्ता सहजासहजी सोडणार नसल्याचे विधान केले होते. याचा अर्थ सत्तेत टिकून रहाण्यासाठी ट्रम्प वाटेल ती पातळी गाठणार, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्याचा प्रत्यय त्यांनी या हिंसाचारातून दिला. या सर्वांतून प्रामुख्याने समोर आली ती डोनाल्ड ट्रम्प यांची हुकूमशाही वृत्ती. विशेष म्हणजे याच ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग याला ‘अन्यायी हुकूमशाह’, ‘सनकी’ असे संबोधले होते, तसेच त्या देशावर आक्रमण करण्याची अनेकदा चेतावणीही दिली होती. आज त्याच किम जोंग यांच्या मार्गावर मार्गक्रमण करणार्‍या ट्रम्प यांना आता कोणती उपाधी द्यायची ?, ते अमेरिकेची जनताच ठरवील.

अमेरिकेला घरचा अहेर !

जगात कुठल्याही देशात जरा जरी हिंसाचार झाला, तरी लगेचच अमेरिका  लोकशाहीचा टेंभा मिरवत त्यांना फुकाचे सल्ले देण्यात धन्यता मानते. विशेषतः आपल्या देशाला हा अनुभव वारंवार येत आहे. देशांतर्गत आंदोलने, विशेषतः पुरोगामी आंदोलनामुळे अमेरिका व्यथित होते आणि भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात नाक खुपसत ‘लोकशाही धोक्यात आहे’, ‘भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे’, ‘व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे’, ‘अल्पसंख्यांकांच्या अधिकारांवर गदा येत आहे’, अशी ओरड करते. तेथील काही फुटकळ संस्था, संघटना तसा अहवाल सिद्ध करून लाळघोटेपणा करणार्‍या प्रसारमाध्यमांद्वारे तो प्रकाशित करतात. याद्वारे भारताची पुष्कळ मानहानी करण्याचा प्रयत्न याच अमेरिकेने केला आहे. आता जेव्हा ट्रम्प समर्थकांच्या धुडगुसामुळे अमेरिकेतील लोकशाहीची लक्तरे वेशीला टांगली गेली, तेव्हा ‘खरंच कुणाची लोकशाही धोक्यात आहे ?’, हे सर्व जगाला कळले. इतकेच नव्हे, तर काळ्या-गोर्‍यांच्या वादात गोर्‍या पोलिसांनी अनेक काळ्या लोकांना भररस्त्यात शब्दशः चिरडून कसे ठार केले आहे ?, हेही सर्व जगाने पाहिले आहे. हीच अमेरिकेची लोकशाही आहे का ? यावरून अमेरिकेत लोकशाही व्यवस्था नावाला आहे, तेथे चालते ती हुकूमशाही, हेच या घटना सांगतात. त्यामुळे जेव्हा आपण इतरांना नसते उपदेशांचे डोस पाजतो, तेव्हा आपल्या देशात काय जळत आहे, हे अमेरिकेने प्रथम पहायला हवे अन्यथा त्यांना असे घरचे अहेर सतत मिळत रहातील.

संसदेतील घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना पदच्युत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या हिंसाचारानंतरही अमेरिकन काँग्रेसने संसदेचे कामकाज पुन्हा पूर्ववत चालू ठेवून जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इतकेच नव्हे, तर या हिंसेसाठी ट्रम्प यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची प्रक्रियाही चालू केली आहे. अशा सनकी व्यक्तींच्या राजकीय कारकीर्दीचा शेवटही असाच अपमानकारक होतो. ट्रम्प यांना पदच्युत करून त्यांच्यावर महाभियोग चालवला गेल्यास अमेरिकेची उरलीसुरली अब्रूही वेशीला टांगली जाईल.

पराभव जिव्हारी लागणे, हे एकवेळ समजण्यासारखे आहे; परंतु तो अशा पद्धतीने व्यक्त करणे अतिशय अयोग्य आहे. या हिंसाचारानंतर अमेरिकन काँग्रेसने बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करूनही ट्रम्प यांनी निवडणुकीचा निकाल अमान्य असल्याचा पुनरुच्चार केला. एकूणच रडीचा असा हिंसक डाव खेळल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अमेरिकेच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात कायमचे काळ्या सूचीत गेले आहे, हे मात्र  तितकेच खरे !