
तमिळनाडू सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात रुपयाचे ‘₹’ हे चिन्ह पालटून तमिळ भाषेतील ‘’ हे चिन्ह वापरले आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि त्रिभाषा धोरण यांवरून तमिळनाडू अन् केंद्र सरकार यांच्यामध्ये चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूच्या ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’ (द्रविड प्रगती संघ) सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील रुपयासाठीचे ‘₹’ हे चिन्ह तमिळ भाषेत पालटले आहे. द्रमुक पक्षाचे माजी आमदार एन्. धर्मलिंगम् यांचा मुलगा असलेले तमिळनाडूमधील प्राध्यापक डी. उदयकुमार यांनीच भारताचे ‘₹’ हे चिन्ह बनवले होते. तमिळनाडू सरकारच्या या कृतीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी हा देशात फुटीरतावादी भावना निर्माण करण्याचा आणि देशाच्या अखंडतेला कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.
उदय कुमार यांनी वर्ष २०१० मध्ये ‘₹’ हे चिन्ह बनवले होते. तेव्हाच्या केंद्र सरकारने त्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती, ज्यात अनेक लोक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उदय कुमार यांनी बनवलेल्या चिन्हाला संमती मिळाली होती. करूणानिधी स्टॅलिन यांनीही या चिन्हाचे कौतुक केले होते. तेव्हापासून हे चिन्ह देशभरात सर्वच ठिकाणी वापरले जाते.
तमिळनाडूतील हिंदी भाषेचा तिटकारा हा अनेकदा देशात गंभीर चर्चेचा विषय ठरलेला आहे. केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा धोरण हे ‘प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देणे’ आणि ‘त्यांचा प्रसार करणे’ यांसाठी लागू केले असल्याचे सांगितले; परंतु रुपयाच्या नव्या चिन्हामुळे आणि तमिळ अन् हिंदी हा भाषिकवाद पुन्हा चिघळला आहे.
द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी कोइम्बतूरमधील पोल्लाची रेल्वेस्थानकाच्या फलकावरील हिंदी नाव काळ्या रंगाने पुसून टाकले, इतका हा वाद शिगेला पोचला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना ३ भाषा शिकाव्या लागणार असल्या, तरी कोणतीही भाषा सक्तीची केलेली नाही. यांतर्गत हिंदी नसलेल्या राज्यांमध्ये हिंदी ही दुसरी भाषा म्हणून शिकवली जाऊ शकते. नेमक्या याच सूत्रावरून तमिळनाडू सरकार केंद्र सरकारला विरोध करत आहे. हिंदी भाषिक राज्यांमध्ये दुसरी भाषा इतर कोणतीही भारतीय भाषा असू शकते. त्यामुळे तमिळनाडू सरकारकडून या धोरणाला विरोध होणे, हे निवळ राजकारण आहे, असेच म्हणावे लागेल ! ८५ वर्षांपासून तमिळ भाषेच्या संरक्षणासाठी लढत असल्याचे स्टॅलिन सांगतात; पण भाषास्वातंत्र्याच्या नावाखाली द्रविड चळवळीने केवळ हिंदु धर्मद्वेषच पसरवला आहे, हे जगजाहीर आहे. भाषासंरक्षण नि भाषाभिमान यांची ग्वाही देण्याचे नाटक करणारे हिंदुद्वेषाने झपाटलेले आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राजकारणाच्या नावाखाली भाषेच्या आधारे देशात फुटीरतेची बिजे पेरणारे एका राज्याचे मुख्यमंत्री असणे, हे देशाच्या लोकशाहीला कलंकच म्हटले पाहिजे. राष्ट्रहितार्थ केंद्र सरकारने अशांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.