ग्रामीण भागात धर्मजागृती आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन होणे आवश्यक !

आपली भारतीय संस्कृती कितीतरी प्राचीन आहे, असे आपण ऐकले आहे. रामायणाला अनुमाने ९ लाख वर्षे होऊन गेली आहेत. भगवद्गीतेला ५ सहस्र ५५५ वर्षे झाली आहेत आणि वेद अनादि काळापासून आहेत. वेदांना तर अपौरुषेय (वेद हे कुणा पुरुषाने लिहिलेले नाहीत) म्हटले आहे; कारण ते साक्षात् भगवंताची देण आहे. वेद आणि भारतीय संस्कृती आपल्याकडे एक ‘दैवी वारसा’ म्हणून आले आहेत. वाल्मीकि रामायणाच्या मूळ रूपामध्ये एका शब्दाचाही पालट झालेला नाही. गीतेतही एक शब्द पालटला गेला नाही. ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे.

एवढ्या प्राचीन गोष्टी आपल्याला मिळण्यामागे आपली ‘गुरु-शिष्य परंपरा’ आहे. आपण या परंपरेचा आदर केला पाहिजे आणि ही परंपरा आपल्यापर्यंत सुरक्षितपणे पोचली, त्यासाठी आपण आपल्या पूर्वजांप्रती अत्यंत कृतज्ञ राहिले पाहिजे. आपला सनातन धर्म कुणा एखाद्या व्यक्तीने स्थापन केलेला नाही, तर तो साक्षात् ईश्वरापासून आला आहे. आपल्या धर्मात केवळ एकच ग्रंथ नाही, तर अनेक ग्रंथ, वेद आणि उपनिषदे आहेत. एकच ग्रंथ असता, तर आपला सनातन धर्म मधल्या कालावधीत केव्हा तरी नष्ट झाला असता. सनातन धर्मामध्ये अनेक श्रेष्ठ पुरुष होऊन गेले. अनेकांनी सुंदर ग्रंथनिर्मिती केली आहे. हे खरे असले, तरी त्यामुळे ‘आपला धर्म चुकीचा आहे, त्याची स्थापना झाली नाही’, असे कुणी म्हणू शकत नाही. त्यामुळे ज्या अनमोल गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या आहेत, त्या पुढील पिढ्यांकडे सोपवणे, हे आपले दायित्व आहे.

आपली भारतमाता एक पुण्यभूमी, तपोभूमी आणि धर्मभूमी आहे. येथे आपला जन्म झाला आहे, याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. प्रत्येक पिढीमध्ये कितीतरी संतांनी कठोर तप करून ही तपोभूमी निर्माण केल्यामुळेच ती पवित्र राहील. धर्म अस्त्वित्वात राहिला, तरच ही धर्मभूमी टिकून राहील. यांसाठी नेमकेपणाने करण्यात येत असलेले प्रयत्न येथे दिले आहेत.

(भाग १)

श्री. बालसुब्रह्मण्यम् यांचा परिचय

श्री. बाल सुब्रह्मण्यम्

‘चेन्नई, तमिळनाडू येथील श्री. बालसुब्रह्मण्यम् हे ‘ब्रुक फील्ड इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाचे संचालक आणि प्रवर्तक (प्रमोटर) आहेत. तसेच ते बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘स्टॉक ऑफ एक्सचेंज’चे सदस्य, ‘पार्थसारथी महासभे’चे उपाध्यक्ष, ‘अर्धनारीश्वर ट्रस्ट’ आणि ‘सरस्वती शैक्षणिक न्यास’ यांचे विश्वस्तही आहेत अन्‘एकल अभियान’च्या दक्षिण फ्रान्सचे अध्यक्ष आहेत.

१. भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ असलेल्या गुरु-शिष्य परंपरेचा इंग्रजांकडून नाश

आपण रोमला गेलो, तर ते तेथील रोमन संस्कृतीचे भग्नावशेष म्हणून एखादी तुटकी फुटकी इमारत दाखवतात. त्यानंतर ते आपल्याला विचारतात, ‘तुमच्या सनातन धर्माचे संस्कार कोणते आहेत ?’, तर आपल्या सनातन धर्मात वेद, उपनिषदे आहेत. त्यात प्रचंड ज्ञान भरलेले आहे. हे महान लिखाण हीच आपल्या सनातन धर्माची संस्कृती आहे.

पूर्वीच्या काळी गावांमध्ये भारतीय संस्कृती पुष्कळ वृद्धींगत झाली होती. गावागावांमध्ये मंदिरे आणि गुरु-शिष्य परंपरा अस्तित्वात होती. गुरुकुल होते आणि त्यात वेदांचे ज्ञान दिले जात होते. इंग्रजांनी आपली ही गुरुकुलपद्धत समूळ बंद केली. प्रत्येक गावात ब्राह्मणांवर एक मोठे दायित्व होते. ते आपल्या लोकांवर संस्कार करून टिकवून ठेवत होते आणि दुसर्‍यांनाही संस्काराचे महत्त्व शिकवत होते. त्या वेळी इंग्रजांनी एक मोठे दुष्कर्म केले. त्यांनी ब्राह्मणांना पदव्या, मानपानाचे स्थान आणि धन दिले. त्यातून त्यांना गावांपासून दूर केले. त्यामुळे आपली गावे संस्कारहीन होऊन उजाड झाली. ब्राह्मणांना गावापासून लांब नेल्यामुळे आपल्या लोकांचे भारतीय संस्कारांशी असलेले नाते आपोआपच तुटले. त्यानंतर इंग्रजांनी भारताच्या शिक्षणपद्धतीत इंग्रजीचा अंतर्भाव केला, तसेच विदेशी संस्कार करून आपल्या भारतीय संस्कारांचा समूळ नाश केला.

२. ‘एकल शाळां’च्या माध्यमातून गावांना पुनर्वैभव मिळवून देण्याचा प्रयत्न

गावांना पूर्वीचे स्वरूप परत प्राप्त करून द्यायचे असेल, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मी एका ‘एकल’ संस्थेशी जोडला गेलो आहे. झारखंडमध्ये ग्रामीण भागातील लोक गरीब आणि अशिक्षित आहेत. त्याचा अपलाभ घेऊन ख्रिस्ती त्यांचे धर्मांतर करत आहेत. ते थांबवण्यासाठी तेथे प्रथम आपले ज्ञान पोचवले पाहिजे आणि त्यानंतर त्यांची गरिबी दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. त्याप्रमाणे केल्यावर धर्मांतराला आळा बसला. अशा प्रकारे झारखंड, बिहार, आसाम येथे मोठ्या प्रमाणात वनवासी लोक रहातात. तेथे शाळा नव्हत्या. त्यामुळे तेथेही आम्ही ‘वनबंधू परिषद’ नावाची  (फ्रेन्ड्स ऑफ ट्रायबल सोसायटी) संस्था चालू केली. जेथे जेथे आपले वनबंधू रहात होते, तेथे तेथे आम्ही प्रथम शाळा उघडल्या. त्या नियमित शाळा नाहीत, तर अनौपचारिक शाळा आहेत. तेथे पहिली ते तिसर्‍या इयत्तेपर्यंत शिकवले जाते. त्यांना भारतीय संस्कार प्राधान्याने शिकवले जातात. हा विचार स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने चालू झाला. स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते, ‘जर आपली मुले शाळेत जाऊ शकत नसतील, तर शाळाच मुलांपर्यंत पोचली पाहिजे.’ त्या आधारावर प्रत्येक गावात अल्प खर्चात झाडाखाली किंवा मंदिरात शाळा चालू केल्या. त्यानंतर स्थानिक सुशिक्षित मुलगा किंवा मुलगी यांना प्रशिक्षण देऊन शिकवण्यासाठी सक्षम केले. ‘एक शिक्षकी शाळा’ (वन टीचर स्कूल), म्हणजे सर्व वर्गांना मिळून एकच शिक्षक असेल. सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत ही शाळा चालेल. आम्ही त्या मुलांना किमान ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तेथील मुले सुसंस्कारीतही होतात. प्रत्येक शाळेत ॐ, गायत्री मंत्र, श्लोक असे सर्व काही शिकवले जाते. त्या शाळांमध्ये सरस्वतीमाता, भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांची चित्रे असतात.

३. गावकर्‍यांना शिक्षणासह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगार निर्मिती

या शाळांना प्रतिसाद मिळत गेला. त्यानंतर अशाच प्रकारे आम्ही १ लाख गावांमध्ये शाळा उघडल्या. आपण गावात पोचलोच आहोत, तर दुसरे कार्यही वाढवले पाहिजे. यासमवेतच आरोग्यासाठी एक विभाग चालू केला. ज्यामध्ये लोक आरोग्य आणि स्वच्छता यांविषयी जागरूक होत आहेत. नंतर ‘ग्रामोतंत्र’ हा वेगळा विभाग चालू केला, ज्यामध्ये गावातच त्यांचा उदरनिर्वाह कसा वाढू शकतो ? त्याचे मार्ग सांगतो. यासमवेतच स्वयंशिस्त आणि संस्कार यांविषयीही मार्गदर्शन केले. आपले संस्कार टिकून राहिले पाहिजे, हा यामागे मूळ उद्देश आहे.

४. धार्मिक संस्कार करण्यासाठी ‘हरि सत्संग समिती’ची स्थापना

गावातील लोकांवर धार्मिक संस्कार करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम ‘हरि सत्संग समिती’ नावाने वेगळी संस्था उभी केली. प्रत्येक गावातील शिक्षित; पण हरिकथेची आवड असणार्‍या व्यक्तींना अयोध्येमधील आमच्या केंद्रामध्ये आमंत्रित करतो. तेथे त्यांना ‘रामचरितमानस’ शिकवतो. भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या वृंदावनात आम्ही त्यांना ‘भागवतकथा’ शिकवतो. ३-३ मासांचा हा अभ्यासक्रम असतो. त्यामध्ये त्यांना ‘तुलसीदास रामायण’ आणि ‘भागवत’ शिकवतो. ३ मासांनंतर त्यांच्याकडे उत्तरदायित्व सोपवतो. त्यांनी जवळपासच्या ३०-३० गावांमध्ये जाऊन हरिकथा कराव्या आणि लोकांना सुसंस्कारित करावे, असे त्यांना सांगण्यात येते.

दक्षिण भारतात कुंभकोणम् आणि कर्नाटकमधील गंगावती येथे असेच प्रशिक्षण केंद्र चालू केले आहे. दक्षिण भारतात आम्हाला थोडे कठीण जात आहे; कारण त्यांना अशा कथा-गोष्टींची फारशी आवड नसते. असे असूनही आम्ही त्यांना स्थानिक श्लोक आणि कथा यांच्या माध्यमातून सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व ठिकाणी प्रत्येक परिवारात एक ‘हनुमान परिवार’ निर्माण केला आहे. ज्यामध्ये प्रत्येक परिवार ‘हनुमान चालिसा’चे पठण करेल आणि सत्संगातही हनुमान चालिसाचे पठण करेल. त्यासाठी आम्ही त्यांना काही धनराशीही देतो.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. बालसुब्रह्मण्यम्, संचालक, ‘ब्रुक फील्ड इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’, चेन्नई, तमिळनाडू.