शेतकरी आंदोलनाची स्थिती तबलिगी जमातसारखी होऊ नये !  

सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदोलनावरून व्यक्त केली चिंता !

न्यायालयाला अशी चिंता व्यक्त करावी लागते, याला पोलीस, प्रशासन आणि शेतकरी उत्तरदायी आहेत ! प्रसारमाध्यांकडून प्रसिद्ध होणार्‍या वृत्तांवरून शेतकर्‍यांकडून कोरोनाविषयीच्या कोणत्याही नियमांचे पालन होतांना दिसत नाही, हे जगजाहीर आहे; मात्र सामान्य लोकांकडून दंड वसूल करणारे प्रशासन आणि पोलीस येथे गांधी यांच्या माकडांप्रमाणे कृती करत आहेत, तसेच नियम भंग करणारे शेतकरीही जनताविरोधी कृती करत आहेत !

नवी देहली – देहलीतील सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करत आहेत का ?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करतांना विचारला. ‘आम्हाला ठाऊक नाही कि शेतकारी कोरानापासून सुरक्षित आहेत कि नाही ? जर ते नियमांचे पालन करत नसतील, तर तबलिगी जमातसारखी समस्या निर्माण होऊ शकते’, असेही न्यायालयाने पुढे म्हटले. न्यायालयाने याविषयी २ आठवड्यांत माहिती देण्याचा आदेश सरकारला दिला. देशात कोरानाच्या प्रारंभीच्या काळात देहलीतील निजामुद्दीन येथील तबलिगी मरकजमध्ये शेकडोंच्या संख्येने तबलिगी एकत्र राहिले होते आणि याची माहिती सरकारला देण्यात आली नव्हती आणि ते नंतर देशातील विविध ठिकाणी परत गेल्यावर देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता.

१. न्यायालयाने केंद्र सरकारचे अधिवक्ता सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांना उद्देशून म्हटले, ‘तुम्ही आम्हाला सांगा की, तेथे काय होत आहे ?’ यावर तुषार मेहता म्हणाले की, आम्ही स्थितीची माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

२. न्यायालयाने म्हटले की, आम्ही हे निश्‍चित करण्याचा प्रयत्न करू की, कोरोनाचे संक्रमण होणार नाही. जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न होईल, यासाठी आदेश देऊ.