शंखवाळी तीर्थक्षेत्री पूजा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम स्थानिक ख्रिस्त्यांनी विरोध करत बंद पाडल्याचे प्रकरण
वास्को, ५ जानेवारी (वार्ता.) – शंखवाळी तीर्थक्षेत्री पूजा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम करणार्यांवर कारवाई करण्यासाठी कुठ्ठाळीच्या भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा अन् सांकवाळ येथील ‘पॅरिशनर्स’ (चर्चचे सदस्य) यांनी शासनावर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे. आमदार एलिना साल्ढाणा आणि सांकवाळ येथील ‘पॅरिशनर्स’ (चर्चचे सदस्य) यांनी मुरगाव तालुक्याचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांची ३ जानेवारी या दिवशी भेट घेऊन शंखवाळी तीर्थक्षेत्री धार्मिक कार्यक्रम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या भेटीनंतर आमदार एलिना साल्ढाणा पत्रकारांना म्हणाल्या, ‘‘सांकवाळ येथील ग्रामस्थांमध्ये (ख्रिस्त्यांमध्ये) तीव्र असंतोष असल्याने मला धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण होणार असल्याची भीती वाटते. ३० डिसेंबर या दिवशी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळी (शंखवाळी तीर्थक्षेत्री) केलेल्या धार्मिक कार्यक्रमाचा मी निषेध करते. प्रत्येकाच्या धार्मिक भावनांचा आदर राखला गेला पाहिजे.’’
सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी (‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी) ३० डिसेंबर या दिवशी देवीच्या स्थानिक भक्तगणांनी पूजा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम केला होता. हा कार्यक्रम चालू असतांना स्थानिक ख्रिस्त्यांनी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही चर्चची भूमी असल्याचा दावा करून पोलिसांवर दबाव आणत भक्तांचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद पाडला.
पोलिसांकडून अहवाल मागवणार ! – सचिन देसाई, उपजिल्हाधिकारी, मुरगाव तालुका
सांकवाळ येथील घटनेला अनुसरून पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे. यानंतर आवश्यकता भासल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी दिली.