ताजमहालमध्ये हिंदु युवा वाहिनीच्या कायर्कर्त्यांनी भगवा फडकावत दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा

४ जणांना अटक

सरकारने तेजोमहालया (ताजमहाला) विषयीचे सत्य जनतेसमोर आणल्यास अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. तेजोमहालयाशी हिंदूंच्या श्रद्धा आणि भावना जोडलेल्या असल्याने सरकारने हे सत्य जनतेसमोर आणण्याचे धारिष्ट्य दाखवले पाहिजे !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील प्रसिद्ध ताजमहाल परिसरात हिंदु युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी शिवचालिसाचे पठण करत भगवे ध्वज फडकावले. ते येथे एका बाकावर बसले आणि त्यांनी त्यांच्या पँटच्या खिशातून भगवा ध्वज काढून तो फडकवायला प्रारंभ केला. तसेच त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणाही दिल्या. या वेळी येथे तैनात असलेल्या सी.आय.एस्.एफ.च्या कर्मचार्‍यांनी त्यांना कह्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तत्पूर्वी या कार्यकर्त्यांनी या घटनेचे चित्रीकरण करून सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. सी.आय.एस्.एफ्.कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ताजगंज पोलिसांनी हिंदु युवा वाहिनीचे जिल्हाध्यक्ष गौरव ठाकूर, सोनू बघेल, विशेष कुमार आणि ऋषी लवानिया यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे आणि अशांतता पसरवण्याचा गुन्हा नोंदवला आहे. (येथे धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्‍न उपस्थित होत नाही ! ताजमहाल हे हिंदूंचे तेजोमहालय असून तेथे पूर्वी हिंदूंची वास्तू होती. त्याविषयीचे ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत ! – संपादक) गौरव ठाकूर यांनी यापूर्वीही ताजमहालमध्ये शिवचालीसा पठण केल्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता.