पुणे – इतर राज्यांत काही शहरांचे झालेले नामांतर किंवा औरंगाबादचे संभाजीनगर हे नामांतर लोकांशी जोडलेली सूत्रे आहेत; पण म्हणून सर्व शहरांचे नामांतर करणे योग्य नाही. राज्यात युतीचे सरकार असतांना औरंगाबाद महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेने नामांतराचा प्रस्ताव सरकारला दिला नाही म्हणून ५ वर्षांत या प्रश्नावर निर्णय होऊ शकला नाही, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ३ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत मांडली.
उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या नात्याने धरसोड वृत्ती सोडून ठाम भूमिका घ्यावी. महापालिका निवडणुकीत हे सूत्र घ्यायचे कि नाही, याचा निर्णय पक्ष घेईल, असेही दरेकर यांनी सांगितले. तसेच राज्य सरकार निधी देत नसल्याने ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारखे अनेक प्रकल्प ठप्प झाले आहेत. निधीअभावी पुण्याच्या विकासाला खीळ बसली आहे, असेही त्यांनी सांगितले.