पाद्रयांची वासनांधता जगाला आता नवीन राहिलेली नाही. अनेक दशकांपासून अमेरिका आणि युरोप येथे पाद्रयांकडून महिला, लहान मुले आणि नन यांचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याची वृत्ते समोर येत आहेत. काही घटना काही दशकांनंतर उघडकीस आलेल्या आहेत. या प्रकरणी दोषी पाद्रयांना कोट्यवधी रुपयांच्या दंडाचीही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकरणी स्वतः ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांनी क्षमाही मागितली आहे. ‘जगात इतके झालेले असतांना आणि आताही होत असतांना भारतातील पाद्री मागे कसे असतील ?’, असा प्रश्न पडू शकतो. तेव्हा भारतातही अशा घटना घडल्या आहेत किंवा ज्या समोर आल्या त्यापेक्षा अशा घटनांची संख्या अधिक असू शकते; मात्र ‘चर्च संस्थेकडून त्या दडपण्यात आल्या, असे उघड झालेल्या घटनांविषयी चर्चची भूमिका पहाता म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल याच्या प्रकरणात चर्चमधील नननेच तिचे मुलक्कल याने अनेकदा लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. यानंतर त्याला अटकही झाली आहे. या प्रकरणी चर्च संस्थेने ननची बाजू घेण्याऐवजी मुलक्कल याला कसे साहाय्य होईल, असाच प्रयत्न केला. पीडित ननला साहाय्य करणार्या अन्य नन यांचाही छळ करण्याचा प्रयत्न झाला. हा खटला अद्याप चालू आहे. याचा निकाल पुढे काय लागेल, हे पहावे लागणार आहे. यात मुलक्कल दोषी ठरला, तर कदाचित् पाद्रयांच्या वासनांधतेची भारतातील ही पहिली उघड झालेली घटना असू शकते. सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणात वासनांधतेचा गुन्हा म्हणून घडलेला नाही. हे प्रकरण हत्येचा गुन्हा म्हणून समोर आले आणि त्या प्रकरणी पाद्री थॉमस कोट्टूर अन् सिस्टर सेफी यांना दोषी ठरवण्यात आले आहे. वास्तविक ही घटना वासनांधतेचा बळी असणारी आहे. सिस्टर अभया यांनी पहाटे पाद्री फूथराकयाल, पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने या तिघांनी तिची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला, असा आरोप होता. ही घटना आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजेच पाद्रयांच्या वासनांधतेमुळे सिस्टर अभयाची हत्या झाली, हेच वास्तव होते, हे आता लागलेल्या निकालानंतर स्पष्ट झाले. त्यातील पाद्री फूथराकयाल निर्दोष ठरलेे. गेली २८ वर्षे ही वासनांधता दडपण्याचा आटोकाट प्रयत्न चर्च संस्था आणि अन्वेषण यंत्रणा यांच्यातील काही वरिष्ठ अधिकारी यांनी केला; मात्र तो शेवटी अयशस्वी ठरला. यातून लक्षात आले की, केवळ पाद्रीच नव्हे, तर काही ननही वासनांधतेमुळे त्यांच्या मूळ आध्यात्मिक साधनेपासून ढळतात आणि सर्वसामान्य व्यक्तीपेक्षाही खालच्या स्तराला जातात. इतकेच नव्हे, तर चर्च संस्थेचेही यातून खरे रूप समाजासमोर आले आहे. आतापर्यंत देशात चर्च संस्थेला हिंदूंची मंदिरे आणि मुसलमानांच्या मशिदी यांच्या तुलनेत अधिक सुसंस्कृत, सभ्य आणि प्रेमाचे अन् शांततेचे पाईक समजले जात होते. हे किती तकलादू आणि ढोंगी आहे, हे या घटनेतून उघड झाल्याचे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये. चर्च संस्थेचे खरे स्वरूप भारतियांच्या आता लक्षात येऊन ते त्यांच्याविषयी ताकही फुंकून पितील, अशी अपेक्षा.
दोषींना पाठीशी घालणार्यांवरही कारवाई हवी !
सिस्टर अभया हत्येचा उलगडा होण्यासाठी २८ वर्षे जावी लागली, ही अतिशय मोठी गोष्ट आहे. २७ मार्च १९९२ च्या पहाटे सिस्टर अभया हॉस्टेलच्या स्वयंपाकघरात गेल्या असत्या त्यांनी पाद्री फूथराकयाल, पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. त्यामुळे या तिघांनी तिला धरून तिच्या डोक्यावर प्रहार करत तिला बेशुद्ध केले. तिला बेशुद्धावस्थेच खेचत नेत हॉस्टेलच्या आवारातील विहिरीमध्ये फेकून दिले. नंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत, ही आत्महत्या भासवली. त्यानंतर चौकशीत स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि सीबीआय यांनी ही आत्महत्या घोषित केली. त्यानंतर वर्ष १९९३ मध्ये सीबीआयने चौकशीत ही आत्महत्या नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुढील १५ वर्षे याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नंतर ६७ नन्सनी न्यायालयात याचिका करून या प्रकरणाची हत्या म्हणून चौकशी करण्याची मागणी केल्यावर पुन्हा चौकशी चालू झाली. या वेळी न्यायालयानेही या प्रकरणी सीबीआयला फटकारले होते. नंतरच्या चौकशीत ही हत्या असल्याचे समोर आल्यानंतर वरील तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यातही वर्ष २०१८ मध्ये पाद्री फूथराकयाल याला निर्दोष ठरवण्यात आले आणि आता उर्वरित दोघांना दोषी ठरवण्यात आले. पाद्रयांकडून अशा प्रकारचे कृत्य होऊ शकते, यावर सर्वसामान्य व्यक्तीचा विश्वासच बसणार नाही. केवळ राजकीय नेते, श्रीमंत लोकच गुन्हे दडपण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकदा ते यात यशस्वी होतात, असे सर्व सामान्यांना नेहमीच दिसत असते. या हत्येच्या प्रकरणात जवळपास तसेच झाले; मात्र ईश्वरेच्छा वेगळीच असल्याने शेवटी अभया यांचे मारेकरी उघड झाले. सीबीआयकडे चौकशी येण्यापूर्वी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. अभया यांना मारण्यात आले त्या वेळी त्यांनी जे कपडे घातले होते, ते सापडले नाहीत. प्रारंभी शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचे कारण ‘बुडून मृत्यू’ असे होते. त्यात त्यांच्या शरिरावरील घावांचा कुठलाही उल्लेख करण्यात आला नव्हता. या प्रकरणातील ३ साक्षीदारांनी नंतर त्यांच्या जबान्या फिरवल्या होत्या. यातून लक्षात येते की, एखाद्या चित्रपटाची कथा असल्यासारखे ही घटना होती. चर्च संस्थेने या प्रकरणात सत्य माहिती समाजासमोर ठेवून पाद्रयांचे स्वरूप उघड करणे आवश्यक होते. तसे केले असते, तर चर्च संस्थेविषयी लोकांच्या मनात आदर वाढला असता; मात्र आता चर्च संस्थेकडे लोक संशयानेच पहाणार आहेत, असेच म्हणावेसे वाटते. आता न्यायालयाने इतकी वर्षे हे प्रकरण ज्यांनी आत्महत्या म्हणून दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करावा, असेही जनतेला वाटते.
प्रसारमाध्यमांचे मौन !
२८ वर्षांनंतर या घटनेमध्ये पीडितेला न्याय मिळाला असतांना प्रसारमाध्यमांनी याला हवी तशी प्रसिद्धी दिलेली नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. एरव्ही हिंदूंचे संत, साधू यांच्याविरोधात एखादी तक्रारही कुणी केली, तर त्याला मोठी प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे याविषयी मात्र दुटप्पी भूमिका घेतांना दिसले. हे वृत्त राष्ट्रीय वृत्तांमध्ये ठळकपणे कुठेही प्रसारित केल्याचे दिसून आले नाही. यावर एखादे चर्चासत्र घेतले गेले नाही. हिंदूंच्या विषयी असते, तर सर्वच प्रसारमाध्यमांनी यावर चर्चासत्रे घेतली असती. परदेशात पाद्रयांकडून होणार्या लैंगिक शोषणावरही भारतातील प्रसारमाध्यमे मौन रहाणेच पसंत करत असतात. जसे की अशा काही घटना घडतच नाहीत, अशीच त्यांची मानसिकता असते.