|
(गंगा जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती. तिचे पालन करण्यासाठी केवळ हिंदूंवरच दबाव बनवला जातो.)
राजापूर (जिल्हा रत्नागिरी) – शिमगोत्सवात होळीचे झाड नेण्याच्या पारंपरिक मिरवणुकीच्या वेळी येथील जवाहर चौकातील मशिदीजवळ हिंदू आणि मुसलमान यांच्यात संघर्ष झाला. मशिदीच्या पायर्यांना होळीचे झाड टेकवण्याची वर्षानुवर्षांची जुनी परंपरा असून या वेळी मात्र मशिदीचे फाटक बंद ठेवण्यात आले होते. या वेळी तेथे जमलेल्या हिंदूंनी मशिदीच्या आवारात जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ढकलून देण्यात आले. यामुळे संतापलेल्या हिंदूंनी होळीचे लाकूड फाटकातून आत घुसवले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या वेळी दोन्ही गटांनी घोषणा दिल्याने तणाव वाढला. पोलिसांनी परिस्थिती हाताळत घोषणाबाजी आणि बेकायदेशीर जमावबंदीसाठी १३ जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
हा व्हिडिओ प्रसारित करत ‘बीबीसी’, ‘द क्विंट’, ‘अल्ट न्यूज’ आदी हिंदुद्वेष्ट्या प्रसारमाध्यमांनी परंपरेच्या विषयाला सोयीस्कररित्या बगल देऊन हिंदूंनाच लक्ष्य केले आहे. अशातच पोलिसांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून ‘अफवा पसरवणार्यांवर कारवाई करणार’, असे आश्वासन दिले आहे. तसेच दिशाभूल करणारा व्हिडिओ काढून टाकण्यात आल्याचा दावाही केला आहे. प्रत्यक्षात तो व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित होत आहे. सध्या परिस्थिती सामान्य झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
असा आहे घटनाक्रम !
१२ मार्चच्या सायंकाळी ७:३० वाजता गावातील जवाहर चौकात शिमगा मिरवणुकीच्या वेळची ही घटना ! प्रत्येक ५ वर्षांनी ही मिरवणूक काढली जाते. होळीसाठीचे झाड घेऊन जाणारी ही मिरवणूक धोपेश्वर मंदिरात संपते. परंपरेनुसार वाटेत असणार्या मशिदीच्या पायर्यांवर काही मिनिटांसाठी होळीचे हे झाड ठेवले जाते. देवी नीनादेवी यांच्या सन्मानार्थ हे केले जाते. नेहमीच शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात ही मिरवणूक पार पडत असते. यावर्षी मात्र या मशिदीचे प्रवेशद्वार बंद होते, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळाली.
याच मशिदीच्या प्रवेशद्वारावर कथितरित्या आक्रमण झाल्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर येथे अशांतता पसरली.
हिंदूंनी बळजोरीने मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताचे पोलिसांकडून खंडण !रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, कोकणातील परंपरा वेगळ्या आहेत. परंपरेनुसार ‘होळीच्या झाडाची मिरवणूक’ मशिदीच्या दाराशी आणली जाते आणि होळीच्या झाडाचा मशिदीच्या पायर्यांना स्पर्श केला जातो. प्रतिवर्षी मुसलमान या मिरवणुकीत सहभागी होतात. या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी नारळ देण्याचा मान पारंपरिकपणे मुसलमानांना दिला जातो; मात्र या मिरवणुकीच्या वेळी घोषणाबाजी आणि आक्रमकता झाली. आम्ही महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत बेकायदेशीर जमवाजमवीसाठी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. परिस्थिती शांत आहे आणि तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही. |
देशाच्या विरोधात कुणी कारवाई करत असेल, तर त्यांना अद्दल घडलीच पाहिजे.! – पालकमंत्री उदय सामंत

धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो, तर मला असे वाटते की, हा त्रास सगळ्यांनाच होणार आहे. जर कणी चुकत असेल, तर त्याच्यावर १०० टक्के कारवाई झाली पाहिजे. जे या देशावर प्रेम करून या ठिकाणी नागरिक म्हणून रहातात, त्यांना संरक्षण मिळालेच पाहिजे; परंतु देशामध्ये राहून देशाच्या विरोधात कुणी कारवाई करत असेल, तर त्यांना अद्दल घडलीच पाहिजे.
राजापुरातील परिस्थिती आटोक्यात असल्याने नाहक वातावरण भडकावू नका ! – आमदार नीलेश राणे

रत्नागिरी – कोकणात सगळेच सण-उत्सव शांततेत साजरे होतात, राजापुरातील स्थितीही आटोक्यात आली असून आम्ही असेपर्यंत कोकण पेटू देणार नाही. सामाजिक माध्यमांवरील काही स्वयंघोषित ‘हँडल्स’ने वातावरण बिघडवू नये, असे आवाहन आमदार नीलेश राणे यांनी केले.
आमदार राणे पुढे म्हणाले, ‘‘धोपेश्वर होळीच्या वेळी घडलेल्या घटनेतील केवळ ठराविक भाग दाखवण्यात येत आहे. कोकणात इतके वर्ष या सणाच्या वेळी काहीही झाले नाही, याही पुढे होऊ देणार नाही.’’
संपादकीय भूमिका‘गंगा जमुनी तहजीब’ची आरोळी ठोकणारे आता मुसलमानांनी होळीच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या ‘सौहार्द’पूर्ण परंपरेला फाटा फोडण्याच्या विरुद्ध चकार शब्दही काढत नाहीत. दुसरीकडे परंपरेचे पालन करण्यासाठी प्रयत्न करणार्या हिंदूंना वेठीस धरले जात आहे. हिंदुविरोधकांचे हे षड्यंत्र आहे, हे विसरू नका ! |