|
जळगाव – जिल्ह्यातील बोदवड रेल्वेस्थानकालगतचे बंद फाटक तोडून रेल्वे मार्गावर आलेल्या मालमोटारीला अमरावती एक्सप्रेस या रेल्वेने धडक दिली. ही घटना १४ मार्च या दिवशी पहाटे ५ वाजता घडली. रेल्वेचा वेग अल्प असल्याने अनर्थ टळला; मात्र या अपघातामुळे भुसावळ-नागपूर-हावडा मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली होती.
१. बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटक उड्डाणपूल उभारल्याने बंद केले होते; पण मालमोटारीच्या चालकाला त्याची कल्पना नसल्याने त्याने भरधाव वेगात गाडी आणली. फाटक बंद असल्याचे दिसले; पण वेगावर नियंत्रण न मिळवता आल्याने गाडी फाटक तोडून थेट रेल्वे रूळावर आली.
२. त्याच वेळी अमरावती एक्सप्रेसचा वेग बराच अल्प असल्याने चालकाला ती थांबवता आली; पण तरीही रेल्वेची धडक बसल्याने मोटारीचा चुराडा झाला. त्यातील गव्हाची पोती विखुरली. अचानक ब्रेक दाबला गेल्याने एक्सप्रेसमध्ये झोपलेले अनेक प्रवासी बर्थवरून खाली पडले.
३. पहाटेच्या अंधाराचा अपलाभ घेत मोटारचालक पसरा झाला. जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त मालमोटारीसह त्यातील गव्हाची पोती हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.