गोव्यात गोवंशियांची हत्या करणार्‍याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा कायदा करावा ! – हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

डावीकडून श्री. सुशांत दळवी, माहिती देतांना श्री. हनुमंत परब, श्री. कमलेश बांदेकर आणि श्री. गिरीश परुळेकर

पणजी, १४ मार्च (वार्ता.) – गोमंतभूमी गायीला देवासमान मानते. त्यामुळे गोव्यात गोवंशियांची हत्या होऊ न देणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहांना कायमस्वरूपी टाळे ठोकले पाहिजे. गोवंशियांची हत्या करणार्‍याला जन्मठेप आणि ५ लाख रुपये दंड ठोठावण्याचा कायदा राज्य सरकारने करावा, अशी मागणी ‘गोवंश रक्षा अभियान, गोवा’चे अध्यक्ष श्री. हनुमंत परब यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यानंतर आझाद मैदान, पणजी येथे पत्रकारांना ही माहिती देण्यात आली. या वेळी ‘गोवंश रक्षा अभियान’चे उपाध्यक्ष श्री. कमलेश बांदेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुशांत दळवी आणि ‘भारत स्वाभिमान’चे उपाध्यक्ष श्री. गिरीश परुळेकर हे उपस्थित होते.

या निवेदनातील प्रमुख सूत्रे पुढीलप्रमाणे –

१. ‘उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पात देशी गोवंशियांची हत्या होणार नाही’, अशी अधिसूचना सरकारने प्रसिद्ध करावी. देशी गोवंश ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कायदा करावा.

२. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील अनधिकृत पशूवधगृहांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस खाते, पशूसंवर्धन खाते, अन्न आणि औषध प्रशासन यांना द्यावेत. राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे भुईसपाट करावीत. गाेवा मांस प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य कुठेही गोवंशियांची हत्या न करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या आदेशाचे कठोरतेने पालन करावे.

३. गोवंशियांची हत्या होते, अशी ठिकाणे आणि ती करणार्‍या व्यक्ती यांची गुन्हे अन्वेषण विभागाने तालुकावार सूची सिद्ध करून त्यांच्यावर कारवाई करावी.

४. गोव्यातील गोमांसाची अनधिकृत आयात रोखणे आणि गोवंशियांची अवैध निर्यात रोखणे यांसाठी कर्नाटक अन् महाराष्ट्र राज्यांच्या तपासनाक्यांवर पशूसंवर्धन खाते, अन्न-औषध प्रशासन, ‘आर्.टी.ओ.’ अधिकारी, अशासकीय संस्था यांच्या प्रतिनिधींचा एक गट नेमावा.

५. गोवंशियांची चोरी करणे आणि गोवंशियांची हत्या करणे यांसंबंधी वाळपई पोलीस ठाण्यात ४, तर फोंडा पोलीस ठाण्यात ३ प्रकरणे नोंद असलेला वाळपई, सत्तरी येथील खाटीक उस्मान याला त्वरित तडीपार करावे. उस्मान याचे अनधिकृत पशूवधगृहाचे बांधकाम भुईसपाट करावे.

गोवा सरकार गोमाता आणि गोवंश यांच्या संरक्षणासाठी गंभीर ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

वाळपई – गोवा सरकार गोमाता आणि गोवंश रक्षण यांसाठी गंभीर आहे. गोशाळांसाठी सरकारकडून सर्व सहकार्य केले जाईल. याविषयी चिंता करायची आवश्यकता नाही. गोहत्या बंदी करणे आणि गुरांची अनधिकृत हत्या रोखणे यांविषयी कायद्यात कडक तरतूद करण्यात येणार आहे. गोवंशियांची अवैध हत्या रोखण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आलेले आहेत, तरीही असे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येकाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ‘गोवंश रक्षा अभियान’ चांगले कार्य करत आहे. नुकत्याच पार झालेल्या ‘गोवा आध्यात्मिक महोत्सवा’मध्ये गोवंशियांची हत्या बंद करून त्यांचे रक्षण करण्याच्या सूत्रावर चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

‘गोवंश रक्षा अभियान’च्या वतीने सांखळी येथील रवींद्र भवन येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोवंशियांची अवैधपणे हत्या करणार्‍यांवर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब, गोप्रेमी श्री. भगवान हरमलकर, ‘श्री माऊली वारकरी’ संप्रदायाचे श्री. दयानंद कामत, ‘जय श्रीराम गोशाळा’ कार्यालयाचे प्रमुख श्री. वासुदेव झरेकर, माळी समाजाचे श्री. कापुराराम माळी, ‘क्षत्रिय घांची समाजा’चे श्री. अमरजी बोराना, ‘राजीव दीक्षित विचार मंच’चे श्री. संदीप सुतार, सनातन संस्थेचे श्री. तुळशीदास गांजेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर आदी उपस्थित होते.