एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष चालू करण्यासंबंधी सुधारित नियमांच्या मसुद्याविषयी अधिसूचना जारी

नियमांविषयी सूचना आणि आक्षेप यांसाठी ५ दिवसांची मुदत

पणजी, १४ मार्च (वार्ता.) – इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वी आणि १२ वी यांसाठी चालू शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर एक आठवड्याची सुट्टी देऊन एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष चालू करण्यासंबंधी शिक्षण खात्याकडून १२ मार्च २०२५ या दिवशी सुधारित नियमांच्या मसुद्याविषयी अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. गोवा शालेय शिक्षण कायदा १९८४ च्या कलम २९ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कायद्यात सुधारणा करण्यात येत आहेत. यानुसार गोवा शालेय शिक्षणासंबंधीच्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. या नियमांविषयी काही सूचना किंवा काही आक्षेप असतील, तर त्या ५ दिवसांच्या कालावधीत पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या संचालकांना पाठवावे, असे शिक्षण खात्याने कळवले आहे.

शिक्षण खात्याने सिद्ध केलेले नियम अंतिम करतांना या सूचना किंवा आक्षेप यांचा विचार करण्यात येईल. ५ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर सरकारकडून या नियमांविषयी विचार करून ते अंतिम केले जाणार आहेत. राज्यात काही पालक, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक संघटना नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने करण्यात येणार्‍या पालटांना आक्षेप घेत असून काहींनी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.