
मांडवगण फराटा (जिल्हा पुणे) – शिरूर आणि दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात जलपर्णी वाढत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत. जलपर्णीमुळे पाणी दूषित झाल्याने त्यामध्ये डासांची उत्पत्ती वाढली असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नदीच्या पाण्यामुळे ते पाणी पिणार्या जनावरांच्या आरोग्यालाही धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून सतत वातावरणात पालट झाला आहे. त्यामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. उन्हाळा चालू झाला की, या परिसरातील अनेक नागरिक भीमा नदीवर पोहण्यासाठी जात होते; परंतु जलपर्णी आणि मळीमिश्रित पाण्यामुळे नदीपात्रात पोहण्यासाठी नागरिक जात नाहीत.
अनेक शेतकर्यांनी भीमा नदीच्या पात्रातून पाणी आपल्या शेतीसाठी नेले आहे; परंतु पाण्यातील फुटव्हॉल्वला जलपर्णी गुंतल्याने विद्युतपंप बंद पडत आहेत, त्यामुळे शेतकर्यांना रात्री-अपरात्री फुटव्हॉल्वला गुंतलेली जलपर्णी काढण्यासाठी जिवाची पर्वा न करता पाण्यामध्ये उतरावे लागते आहे. जलपर्णी हटवण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा आवाज उठवला; परंतु अद्यापही शासनाने यावर कोणतीही उपाययोजना केली नाही. (ग्रामस्थांना परत परत का सांगावे लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? की, प्रशासन याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत आहे ?)