पीओपीविषयी ‘राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग’ तज्ञ समिती अभ्यास करणार ! – सांस्कृतिक कार्य मंत्री अधिवक्ता आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य मंत्री अधिवक्ता आशिष शेलार

मुंबई – पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिसच्या) श्री गणेशमूर्तीच्या वापराविषयी स्पष्टता यावी, यासाठी ‘राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग’ तज्ञ समिती अभ्यास करणार आहे. शासन मूर्तीकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून येत्या २० मार्चला शासन न्यायालयात भूमिका मांडेल. त्यासाठी आवश्यक तज्ञ अधिवक्ता देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी दिली. पीओपीवरील बंदीच्या विरोधात राज्यातील विविध संघटनांनी १२ मार्चला परेल येथील नरे पार्क येथे आयोजित केलेल्या मूर्तीकार संमेलनात ते बोलत होते. या वेळी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह राज्यभरातील मूर्तीकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पीओपीविषयी संभ्रम दूर व्हावा, यासाठी मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी ‘राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगा’ला पत्र लिहून याविषयी तज्ञ समिती नेमून  सर्वंकष अभ्यास करण्याची विनंती केली होती. सदर विषयात आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी या विषयातील तज्ञ समिती नेमून अहवाल देण्यात येईल, असे शासनाला कळवले आहे.

गेल्या काही वर्षात हिंदु सणांच्या विरोधात एक षड्यंत्र रचले जात असून त्याचे संदर्भ देत आशिष शेलार यांनी हे षड्यंत्र हाणून पाडू, असेही स्पष्ट केले. मुंबई महापालिका गेल्या काही वर्षात मूर्तीकारांच्या विरोधात भूमिका घेते आहे, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली.