श्री क्षेत्र आप्पाचीवाडी, कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) – भोळा शंकर हालसिद्धनाथांचा धावा करल, गार्हाण घालल. कोरोना माझ्या पायाशी घेईन, त्याचं गाडप (नष्ट) करीन. ३३ कोटी देवांच दरबार बंद पडल्यात. खडकाचा दरबार (जिथे यात्रा होते, जिथे भाकणूक होते ते ठिकाण) उघडा आहे. चालू राहील, ही धर्माची गादी हाय. ‘धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा’, असे आशीर्वचन श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाने भक्तांना दिले. ही भाकणूक ३ नोव्हेंबर २०२० या दिवशी पहाटे ४.१५ वाजता पू. भगवान वाघापुरे (डोणे) महाराज यांच्या माध्यमातून सांगण्यात आली.
या भाकणुकीत ‘भगवा झेंडा राज्य करील, शत्रूराष्ट्र चीन भारतावर आक्रमण करील, भारत-पाक सीमेवर रण चालेल, पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल, स्त्रीवर्ग राजकारणात बाजी मारेल, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, मुसलमान राष्ट्रे उद्ध्वस्त होतील, जगाच्या नकाशावरून पुसून जातील’, असे पुढे सांगण्यात आले. कोरोनाविषयीच्या नियमांमुळे या वेळी आप्पाचीवाडी, कुर्ली, रायबाग, चिक्कोडी, निपाणी, संकेश्वर, कोल्हापूर आदी गावांतील भक्तगण उपस्थित होते.
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय ! (ही भाकणूक कशा स्वरूपाची असते, हे सर्वांना कळावे, यासाठी ती येथे आहे तशी प्रसिद्ध करत आहोत. या भाकणुकीचा सर्वसाधारण अर्थ वाचकांना समजावा, यासाठी त्यातील काही वाक्यांचा अर्थ कंसामध्ये दिला आहे. – संपादक)
(संकलक : सेवेकरी श्री. वीरभद्र विभूते आणि श्री. राजेंद्र विभूते, कुर्ली, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव.)
भाग १.
१. आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल ।
काढावं काढावं पोथी पुराण काढावं, वाचून दाखवाव, भर सभेत बोलवं. खोटं तू बोलशील सिद्धा खरं मी करीन, सादर राहीन. चालवीन चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन अगा ये गा बाबा, धरतो हालसिद्धाआप्पा मेघ यान माळा माझ्या आकाशाच्या फळा अमृताच्या धारा मेघ उदंड आहे. बांधा आड बांध, शिवा आड शिव (एका शेतात पाऊस पडेल, तर शेजारच्याच एका शेतात पाऊस पडणार नाही, तसेच एका गावात पाऊस पडेल, तर शेजारच्याच दुसर्या गावात पडणार नाही. म्हणजे श्री हालसिद्धनाथांनी सध्याची पाऊस पाण्याची परिस्थिती सांगितली आहे.), मेघाची कावड गैरहंगामी उदंड. (नको असेल, त्या वेळी पाऊस पडेल म्हणजेच अवेळी पाऊस पडेल. जो सध्या पडत आहे.)
मेघाच्या पोटी आजार आहे. (पूर्वी पाऊस योग्य त्या वेळी योग्य त्या मासात पडत असे. याउलट सध्या मानवनिर्मित प्रदूषणामुळे पावसाचे पाणीही प्रदूषित होत आहे. त्यामुळे ‘मेघाच्या पोटी आजार आहे’, असे म्हटले आहे.) पिक पाण्यावर, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय. दुनिया न्याहाळू लागलाय. त्याच्या मागं अंधार म्होरं अंधार पडलाया. (सध्याच्या जनतेच्या पापकर्माचा अंधार पडला आहे.) कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं हाय. नऊ दिन नम, सात दिन भोंब बरोबर हाय. (ज्याप्रमाण नवरात्र नऊ दिवस असते, तशी देवाची यात्रा सात दिवस असते.) वाडी कुर्लीचा अगाध मोठा, जगात झेंडा (वाडी कुर्लीचा महिमा मोठा असून त्याची कीर्ती जगात पसरेल.) भोंबच्या पुनवला माझा सोहळा निघतोया (कोजागरी पौर्णिमेला माझी यात्रा होते.) चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय. (या ठिकाणी नाथांची संजीवन समाधी आहे.) कारीच्या माळाला (देवांचे विश्रांतीसाठी असलेले एक ठिकाण.) माझी विश्रांती हाय. खडकाच्या माळाला भाषण चाललया (ज्या ठिकाणी यात्रा भरते ते ठिकाण, म्हणजेच भाकणूक ज्या ठिकाणी होते ते ठिकाण), खडकाच्या माळाला फार पूर्वीच्या काळाला आसन टाकलयां निशाण रोवलया. (फार पूर्वीपासून देवांचे निवासस्थान या ठिकाणी आहे. माझे हेच स्थान आहे, असे देव सांगत आहे.)
माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. खडकाच्या माळाला ३३ कोटी देवांचा दरबार भरलाय. कांबळ्याच्या खोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड (संपूर्ण विश्वात ज्या घडामोडी चालू आहेत त्यावर देवाचे नियंत्रण आहे.) करत बसलोय. आप्पाचीवाडी सोन्याची काडी तीर्थक्षेत्र प्रतिशिर्डी होईल. तिरुपती बालाजीचा इथं अवतार हाय. आप्पाचीवाडी सोन्याची काडी वाडी कुर्लीच आगार हालसिद्धनाथाच दरबार, हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील.
२. हालसिद्धनाथाचा त्रिभुवनात जयजयकार चाललं ।
पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील. (भंडार्याचा (भंडारा पिवळ्या रंगाचा असतो) महिमा सर्वत्र पसरेल) हालसिद्धनाथाचा त्रिभुवनात जयजयकार चाललं. वाडी-कुर्लीच्या पुजारी मानकर्यांना माझा आशीर्वाद हाय. वाडी-कुर्लीच्या छबिन्यात फूट पाडशिला, तर यमपुरी पाहशीला. भोळा शंकर हालसिद्धनाथांचा धावा करल, गार्हाण घालल. कोरोना व्हायरस माझ्या पायाशी घेईन, त्याच गाडप (नष्ट) करीन. ३३ कोटी देवांच दरबार बंद पडल्यात. खडकाचा दरबार उघडा आहे. चालू राहील, ही धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा.
३. देवधान्य बहुत पिकेल, राजधान्य उदंड पिकेल ।
पिंजर्यातला राघू भाषण करील, (देवाचा ‘संचार’ झाल्यावर अवस्था कशी असते त्याची कल्पना देणारे वाक्य – देह म्हणजे पिंजरा. या पिंजर्यात ज्याला सूक्ष्म ज्ञान आहे, असा आत्मा प्रवेश करून ही भाकणूक करतो.) अश्विनी, भरणी, कात्या, कृतिका, रोहिणी मिरगाच्या बहिणी, सरती रोहिणी निघता मृग कोकण बंधारी कुरी मिरवेल. (कुरी म्हणजे पेरणी यंत्र म्हणजे त्या भागातील पेरणी होईल) बांधा आड बांध, शिव आड शिव. रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा. हातात भाकरी खांद्यावर चाबूक. सरता मृग निघत्या आडद्रा मध्यम फाट्याचा पेरा होईल. (सरता मृग म्हणजे नक्षत्राचा शेवटचा भाग आणि आडद्रा नक्षत्राचा प्रथम भाग होय. शेतकर्यांना केलेले हे मार्गदर्शन आहे. मृगाचा शेवटचा भाग आणि निघत्या आडद्रा म्हणजे आद्रता नक्षत्राचा प्रथम) सरत्या आडद्रा निघता तरणा आलम दुनियेचा पेरा होईल. (जगाचे देवाने तीन भाग केले असून पहिल्या भागाला कोकण विभाग, दुसरा मध्य, उर्वरित भाग म्हणजे आलम दुनिया.) कुरी थार्याला बसेल. (यावर्षीचे काम पूर्ण झाल्यावर कुरी जाग्यावर बसेल म्हणजे आता याचे काम पुढच्या वर्षीचे असेल.) रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल. (दीर्घकालीन पिकासाठी पूरक असा पाऊस होईल.) देवधान्य बहुत पिकेल (तांदूळ भरपूर पिकेल), राजधान्य उदंड पिकेल (जोंधळा भरपूर पिकेल), धारण धोरण जगाचं जीवन. (या धान्याचा दर ठरवण्याची प्रक्रिया त्यावर अवलंबून आहे, असे धोरण. ज्यावरच शेतकर्याचे पुढचे सगळे अवलंबून असते.) खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणतील. तीन मापटी म्हणता शेरावर येईल, शेर म्हणता मापट्या-चिपट्यावर येईल. (धान्याचा दर सर्वसाधारण राहील. तो तीन मापटी म्हणजे सर्वसाधारण दोन किलो धान्य होय !)
४. मूग, कडधान्य, तूर, सोयाबीन उदंड पिकल, डाळीचा भाव तेजीत राहील ।
खरीप भोरीप बहुत उदंड जमिनीला धान्य बहुत बेईमान. तांबडी रास मध्यम काळी रास सुफळ, मूग, कडधान्य, तूर, सोयाबीन उदंड पिकल, डाळीचा भाव तेजीत राहील. पांढर धान्य उदंड पिकल. गोरगरिबाला पुरावा करल. दीड महिन्याच धान्य इथून पुढ पिकल, तांबडी कळी मध्यम पिकल, ताजव्यातून जोखल.(मिरची मध्यम पिकेल; पण दर चांगला मिळेल.) धान्य दारात वैरण कोणात, वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा. (पूर्वी काळ असा होता की धान्य घरी असायचे आणि वैरण हे रानात असायचे. यापुढे काळ असा येइल की एकवेळ धान्य शेतात राहील; पण वैरण जपून ठेवावी लागेल. म्हणजे वैरण अल्प होईल, असे देवाला सांगायचे आहे.)
५. दिवसाढवळ्या डाके-दरोडे पडतील, लुटालुट होईल ।
महाराष्ट्र राज्यात एन्रॉनची वीज येईल, विजेअभावी जनजीवन विस्कळीत होईल. दिवसाढवळ्या डाके-दरोडे पडतील, लुटालुट होईल. सीमाप्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील. सीमाभागात मोठा गोंधळ माजल. निपाणी भागात अतिरेकी मोठा गोंधळ घालतील, जाळपोळ करतील, कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठ भगदाड पडल. कर्नाटक राज्याचा चौथाई कोना ओसाड पडल, जलमय होईल. (सर्वसाधारणपणे शत्रूने बाँबवर्षाव केल्याने एखादे मोठे धरण फुटून कर्नाटक राज्यातील एक चतुर्थांश भाग ओसाड पडेल, अशी आम्हाला दाट शक्यता वाटते. – संकलक)
६. उसाच्या काड्यांन दुधाच्या भांड्यान राजकारणाला मोठी कलाटणी लागल ।
उसाच्या काड्यांन दुधाच्या भांड्यान गावागावांत, तालुका, जिल्ह्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागल. (प्रत्येक वर्षी उसाचे आंदोलन होते. यामुळे गाव-तालुकास्तरावरील राजकारण पालटत जाते. सत्ताकेंद्र पालटत जाईल.) सत्तेसाठी भांडून खेळतील. शेतकरीवर्ग रात्रंदिवस काबाडकष्ट करतील. कष्ट करून गुरढोर घेतील. उगानिगा करतील, उगानिगा करून दूध काढतील. (वैरण आणण्यापासून ते गुरांना घालण्यापर्यंत, जनावरांचे पालनपोषण करून शेतकर्यांच्या हातात प्रत्यक्षात पदरात काही पडत नाही.)
दूध काढून डेरीला घालतील, डेरीचा मॅनेजर मलई खाईत राहील. गुर राखणारा कर्जात राहील, गाई-म्हशींचा भाव गगानाला भिडल. शर्यतीतला बसवा तुम्हाला शाप देईल.(बैलगाड्यांच्या शर्यतीला आता हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे. शर्यतीत बैल जिंकण्यासाठी बैलाला मद्य पाजणे, बैलाला मारणे अशी बैलाची छळवणूक केली जाते. यामुळे बैलाचा शाप अशा लोकांना लागेल.) दुधाचा भाव वाढत राहील. तुम्ही नेसाल जरीकाठी आई-बापाला सतरा गाठी धडूतं मिळतील. (माणसाचे जग आता मी, माझी बायको, माझी मुले एवढ्यापुरते मर्यादित राहिले आहे.) ऊसाचा काऊस होईल. सडकंवर पडेल. (उसावर जर रोगराई वाढली, तर ऊसाला दर मिळणार नाही. तो ऊस कुणी घेणार नाही. असा ऊस शेतातही ठेवणे शक्य नसल्यामुळे तो ऊस नाईलाजास्तव रस्त्यावर टाकून द्यावा लागेल.)
(क्रमशः उद्याच्या अंकात)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/431919.html