रायबाग (जिल्हा बेळगाव) येथे भर बाजारपेठेत महिलेवर अ‍ॅसिड आक्रमण !

महिला गंभीर घायाळ

निर्दयतेची परिसीमा पार करणारी घटना ! समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे या घटनेतून दिसून येते.

बेळगाव, १२ डिसेंबर – बेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये भररस्त्यात भाजी विक्री करणार्‍या एका महिलेवर ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी अज्ञात आक्रमणकर्त्याकडून अ‍ॅसिड फेकण्यात आले. या अज्ञात हल्लेखोराने महिलेशी वाद घालून तिच्या अंगावर अ‍ॅसिडची बाटली ओतली आणि हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. यात महिला गंभीर घायाळ झाली. या वेळी परिसरातील नागरिकांनी तिच्या अंगावर पाणी ओतले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडित महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात भरती केले. महिलेवर अ‍ॅसिड आक्रमण करणारा संशयित अण्णापा सेठ हा पोलीस ठाण्यात काही वेळाने उपस्थित झाला; मात्र त्याने विष प्राशन केले असल्याने त्यालाही बेळगाव रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पीडित महिला गंभीर घायाळ झाल्याने तिला पुढील उपचारासाठी बेळगाव येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी रायबाग पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पसार अज्ञात अ‍ॅसिड हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत. भर बाजारपेठेत झालेल्या या घटनेमुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे.