प्रथमोपचार शिकण्याचा वैयक्तिक आणि सामाजिक दृष्ट्या झालेला लाभ !

सनातन संस्थेचे दूरदृष्टी असलेले संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘आगामी आपत्काळात येणार्‍या संकटांना सामोरे जाता यावे’, यासाठी प्रथमोपचार शिकण्यास सांगितले आणि भारतभरात शक्य त्या सर्व ठिकाणी प्रथमोपचाराचे वर्ग घेण्यास उद्युक्त केले. चोपडा (जळगाव) येथेही प्रथमोपचाराचे वर्ग झाले. त्या वर्गात शिकवल्याप्रमाणे साधकांना झालेल्या लाभाचे उदाहरण येथे दिले आहे.

१. दुचाकीवरून जात असतांना पुढे असलेल्या दुचाकी वाहनाला आग लागल्याचे दिसणे, त्यांना आवाज देऊन सतर्क करणे

‘मी चोपडा येथे झालेल्या प्रथमोपचार शिबिराला उपस्थित रहात होतो. एकदा मी दुचाकीवरून जात असतांना मला माझ्यापुढे असलेल्या दुचाकी वाहनाला आग लागल्याचे दिसले. त्या दुचाकीवर २ व्यक्ती बसल्या होत्या. त्या वेळी मी त्या दुचाकीवरील व्यक्तींना मोठ्याने आवाज देऊन ‘तुमचे वाहन पेट घेत आहे’, असे सांगितले.

२. पुढच्या दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवणे; पण मागे बसलेल्या व्यक्तीच्या कपड्यांनी पेट घेणे, तेव्हा त्याला भूमीवर लोळण घ्यायला सांगणे, त्यामुळे त्या व्यक्तीचे पेटलेले कपडे विझणे

पुढच्या दुचाकीस्वाराने माझा आवाज ऐकून त्याची दुचाकी गाडी थांबवली; पण तोपर्यंत त्या दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीच्या कपड्यांनी पेट घेतला. ती व्यक्ती माझ्याकडे धावत आली. तेव्हा मी प्रसंगावधान राखून त्या व्यक्तीला खाली भूमीवर लोळण घ्यायला सांगितले. ती व्यक्ती भूमीवर लोळल्यावर ५ मिनिटांतच त्या व्यक्तीचे पेटलेले कपडे विझले.

३. कृतज्ञता

या प्रसंगात माझा भाव जागृत झाला. मी एका साधिकेला सांगितले, ‘‘ताई, देवाच्या कृपेने आणि प्रथमोपचार प्रशिक्षण घेतल्याने मी त्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकलो.’’ हे भगवंता, तू ही सूत्रे माझ्याकडून लिहून घेतली. त्यासाठी मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. भालचंद्र राजपूत, चोपडा, जळगाव. (६.४.२०१८)