अंनिसच्या आर्थिक व्यवहारांवरून दाभोलकर कुटुंबीय आणि अंनिसचे पदाधिकारी यांच्यामध्ये दुफळी

  • ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमध्ये त्रुटी असल्याची संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची स्पष्टोक्ती !

  • ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांविषयी डॉ. दाभोलकर यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना अंधारात ठेवल्याचा गंभीर प्रकार उघड !

अंनिस या संघटनेच्या न्यासावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी संघटनेच्या कोणत्याही पदाधिकार्‍याला स्थान दिले नाही, तसेच ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची कल्पनाही दिली नाही. यामध्ये आर्थिक अपहार झाल्याचे दाखले यापूर्वी हिंदु विधीज्ञ परिषदेने अनेकवेळा पुराव्यानिशी दिले आहेत आणि आता तर अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील हेच  याविषयी उघड करत आहेत. यातून डॉ. दाभोलकर यांचे खरे स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे !

मुंबई – अंनिसच्या (अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या) स्थापनेनंतर संघटनेच्या आर्थिक आणि कायदेशीर गोष्टी हाताळण्यासाठी डॉ. दाभोलकर यांनी संघटनेच्या नावानेच एक ‘ट्रस्ट’ स्थापन केला. अंनिसद्वारे चालवले जाणारे वैज्ञानिक जाणिवा, प्रशिक्षण आदी सर्व उपक्रम संघटनेच्या कक्षेत चालू होते. त्यासाठी लागणारा सर्व निधीही संघटनेचे कार्यकर्ते उभा करत होते; मात्र या कामासाठी येणार्‍या सर्व देणग्या या ट्रस्टकडे जमा होत होत्या. अंनिसच्या ‘साधना’ या  मासिकातील विज्ञापनांचा पैसाही ट्रस्टमध्येच जमा होत होता. ‘ट्रस्टच्या या सर्व आर्थिक व्यवहारांविषयी आपणाला काहीच माहिती नव्हती’, अशी स्पष्टोक्ती स्वत: अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. या विषयीचे वृत्त दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या २७ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.

यामध्ये ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांविषयी डॉ. दाभोलकर यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना अंधारात ठेवल्याचा गंभीर प्रकार अविनाश पाटील यांच्या वक्तव्यातून उघड झाला आहे. इतकेच काय, तर ‘संघटनेचा कार्याध्यक्ष असूनही ट्रस्टच्या या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतरच मला मिळाली. ती माहिती घेण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. या आर्थिक व्यवहारांमध्ये त्रुटी होत्या’, अशी खळबळजनक माहितीही अविनाश पाटील यांनी दिली आहे.


या वृत्तामध्ये अविनाश पाटील यांनी म्हटले आहे, ‘वर्ष २०१० मध्ये मी संघटनेचा कार्याध्यक्ष झालो; मात्र ट्रस्टचे अध्यक्ष स्वत: डॉ. नरेंद्र दाभोलकर हेच होते. या देणग्यांतून होणारा हिशोबही तेच पहात होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपर्यंत ही स्थिती अशीच होती. मलाही तोपर्यंत ‘असा एक ट्रस्ट आहे’, या पलीकडे त्यातील व्यवहारांची काहीही माहिती नव्हती.’

संघटनेच्या कार्याध्यक्षांची ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती अपेक्षित असतांना ट्रस्टवर श्रीमती दाभोलकर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव

या वृत्तात अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पुढे म्हटले आहे, ‘‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर १५ दिवसांतच ट्रस्टवर वारसदार म्हणून डॉ. दाभोलकर यांच्या पत्नी शैलाताई यांची वारसदार म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्या वेळच्या मन:स्थितीमध्ये आम्ही ते मान्य केले. शैलाताईंनीही त्या वेळी माझ्यावर विश्‍वास टाकून ‘तू संघटना चालवतोस. त्यामुळे तू मला सांग, तसे आपण करू’, अशी भूमिका घेतली. ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या प्रतापराव पवार यांच्याकडे शैलाताई यांची ट्रस्टवर नियुक्ती करण्याविषयी मी आक्षेप नोंदवला नाही; पण त्या वेळी संघटनेचा कार्याध्यक्ष हाच ट्रस्टचा कार्याध्यक्ष असणे अपेक्षित होते. दोन्हींतला एक दुवा म्हणून ते गरजेचे आहे. पण तसे झाले नाही. त्यामुळे अडचणी वाढत गेल्या.’’

अविनाश पाटील यांनी अंनिसच्या ट्रस्टविषयी केलेल्या वक्तव्यावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर आणि मुलगा हमीद दाभोलकर यांनी ‘आम्ही याआधीही अंनिसचे सामान्य कार्यकर्ते होतो, आजही आहोत आणि यापुढेही आम्ही सामान्य कार्यकर्तेच राहू. संघटनेतील वादविवाद संघटनेच्या अंतर्गत सुटावेत, असे आमचे मत आहे. समाजाच्या विवेकबुद्धीवर आमचा विश्‍वास आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणात अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर आणि डॉ. हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या प्रतिनिधीने त्यांना दूरभाषवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

अविनाश पाटील यांनी दाभोलकर कुटुंबियांवर केलेले गंभीर आरोप

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील

१. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ट्रस्ट यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणार्‍या मासिकाच्या कामात सहभागी झाल्यावर दाभोलकर कुटुंबियांनी समांतर निर्णय प्रक्रिया राबवण्यास प्रारंभ केला. ट्रस्टला समितीच्या विरोधात उभे केले गेले. संघटनेवर अंकुश ठेवण्यासाठी ट्रस्टचा वापर करण्यात आला.

२. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर यांच्या वतीने हमीद दाभोलकर काम बघू लागले. हमीद यांनाही संघटनेत घ्यावे, यासाठी डॉ. दाभोलकर यांच्या निकटवर्तीयांकडून दबाव येऊ लागला. त्या वेळी परिस्थितीजन्य आवश्यकतेमधून लवचिक भूमिका घेतल्याने डॉ. हमीद दाभोलकर यांचा संघटनेत समावेश झाला. सर्व आवश्यक प्रक्रियेला फाटा देण्यात आला.

३. संपादकीय मंडळाच्या सदस्यांनी मुक्ता दाभोलकर यांना संपादकीय मंडळात घेऊन नंतर केवळ माहिती दिली; पण आम्ही आक्षेप घेतला नाही.

४. या काळात जादूटोणाविरोधी कायद्यासाठी पाठपुरावा चालू असतांना हमीद दाभोलकर आणि त्यांचे कुटुंबीय परस्पर प्रसारमाध्यमांकडे जाऊन संघटनेचे प्रवक्तेपणही करू लागले. ज्या कामाविषयी त्यांच्याकडे काही अनुभव किंवा अधिकार नव्हता, त्यावरही ते बोलू लागले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये असंतोष वाढला.

५. त्यांनी संघटनेमध्ये समांतर निर्णयप्रक्रिया चालू केली. परस्पर निर्णय वाढू लागले. कार्याध्यक्ष म्हणून या सर्वांना मला तोंड द्यावे लागत होते. याविषयी विचारणा केल्यावर त्याविषयी स्पष्टीकरण न देता परस्पर गटबाजी चालवली गेली.

६. अंनिसच्या त्रिदशकपूर्तीचे अधिवेशन मुंबईत घेण्यात आले. त्यासाठी खर्चाच्या दुप्पट रक्कम कार्यकर्त्यांनी देणगी स्वरूपात उभी केली होती. या वेळी ट्रस्टकडून खर्च करण्यासाठी रक्कम देण्यास अडचण निर्माण करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांना खिशातून पैसे भरावे लागले. हे पैसे कार्यकर्त्यांना अद्यापही मिळालेले नाहीत.

७. ट्रस्टच्या माध्यमातून संघटनेवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न चालू झाले. ‘संघटनेला अंधारात ठेवून संघटना ट्रस्टच्या अंतर्गत काम करेल’, अशा प्रकारच्या काही तरतुदी त्यांनी करवून घेतल्या.

८. आम्ही संघटना चालवू शकतो, वाढवू शकतो. आम्हाला कोणत्याही मध्यस्थांची आवश्यकता नाही. पुढून काहीही प्रतिसाद मिळत नसेल, तर आम्ही संघटनेच्या हिताचा निर्णय घेऊ.

९. ट्रस्ट जरी संघटनेचा भाग असला, तरी ती संघटनेवर अंकुश ठेवू शकत नाही. संघटनेच्या आवश्यकतेनुसार आम्ही आणखी २-५ ट्रस्ट करू. आम्ही प्रकाशनासाठी ‘विवेक जागर’ ही यंत्रणा सिद्ध केली आहेच.

(संदर्भ : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’, २७ आणि २८ नोव्हेंबर २०२०)

अविनाश पाटील यांचा एककल्ली कारभार चालू होता ! – मिलिंद देशमुख, प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

कुणी विरोधी मत व्यक्त केल्यास त्याला संघटनेतून बाहेर काढण्याची अविनाश पाटील यांची कार्यपद्धत होती. एकप्रकारे त्यांचा एककल्ली कारभार चालू होता. प्रसारमाध्यमांमध्ये दाभोलकर कुटुंबीय सातत्याने प्रकाशझोतात येणे, हे पाटील यांना खपत नव्हते. ‘मला महत्त्व न देता त्यांना दिले जात आहे’, यातून त्यांच्यात सातत्याने अहंकार डोकावत होता. त्यांनी अनेक गोष्टी आमच्या मनाविरूद्ध केल्या; पण आम्ही काही बोललो नाही. ‘सगळे स्वत:च्या हातात असले पाहिजे’, असे त्यांना वाटत आहे. यापूर्वी श्याम मानव यांच्या अशाच कार्यपद्धतीमुळे समितीमध्ये फूट पडली, अशी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांची प्रतिक्रिया २८ नोव्हेंबरच्या दैनिक ‘लोकमत’ च्या पुणे आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

ट्रस्टच्या प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी गेला

‘डॉ. दाभोलकर यांच्यानंतर ट्रस्टचे काम आणि व्यवहार यांच्याविषयी माहिती घेण्याची प्रक्रिया दीड वर्ष करावी लागली. वर्ष २०१३ ते २०१८ या कालावधीत ट्रस्टची काही प्रक्रिया मार्गी लावण्यात आली. अद्यापही काही कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत. सनातन संस्थेकडून करण्यात आलेल्या तक्रारींविषयी डॉ. दाभोलकर यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले होते; मात्र त्या वेळी ट्रस्ट आणि संघटना यांच्यात समन्वय साधणारा कोणताही दुवा नव्हता, ही एक गोष्ट ध्यानात आली. सध्या ट्रस्टमध्ये ५ ते ६ कोटी रुपये जमा आहेत. हा पैसा लोकांनी विश्‍वासाने ट्रस्टकडे जमा केला आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहोत, विश्‍वस्तांना नाही’, असे वक्तव्य अविनाश पाटील यांनी केले आहे.

हे तर केवळ हिमनगाचे टोक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

आरोपांमध्ये तथ्य असल्याचे अविनाश पाटील आता मान्य करत असले, तरी साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने तसा अहवाल यापूर्वीच दिलेला आहे. अपेक्षा अशी आहे की, इतकी वर्षे दाभोलकर यांच्या नावाने डोळे मिटून पैसे देणारे लोक आणि कार्यकर्ते यांनी याचा स्वत:हून तपास करावा. उत्पन्न न दाखवणे, भलताच व्यय दाखवणे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाला खोटी माहिती देणे, असे अनेक काळे व्यवहार त्यांनी केले आहेत. ‘दाभोलकरी अनुयायी म्हणजे खरे विवेकवादी’, ही अंधश्रद्धा यातून नष्ट होईल. खरे तर जनतेचा पैसा लुबाडणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत अविनाश पाटील यांनी लढले पाहिजे. हमीद दाभोलकर यांनीही जनतेसमोर सत्य मांडले पाहिजे. लोकांच्या धर्मभावनांची चिकित्सा करणार्‍यांनी स्वत: पारदर्शक असले पाहिजे. वास्तवात मात्र येथे मोठा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाला आहे, अशी आमची धारणा आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून अध्यक्ष असणारे प्रतापराव पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे बंधू) यांनीही स्वत:ची भूमिका आणि नेमके काय होत आहे, हे सांगायला हवे. ‘सकाळ’ माध्यम समूहाशी निगडित असलेले प्रतापराव पवार यांच्या कार्यालयात अंनिसच्या अनेक बैठका झाल्या आहेत. ते प्रारंभीपासून डॉ. दाभोलकर यांच्याशी निगडित आहेत. त्यामुळे या प्रकरणी स्पष्टीकरण देणे, हे त्यांचे दायित्व आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या (तथाकथित) कार्याशी निगडित असलेले श्याम मानव यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर अनेक आरोप केले होते. मागील दशकात हा वाद गाजलाही होता. त्यामुळे पुढच्या पिढीतील हा वाद घराणेशाहीशी निगडित आहे कि संघटनेचे नेतृत्व हडपण्याचा प्रयत्न आहे, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे समाजापुढे आली पाहिजेत. पुस्तक छपाईचा व्यय दाखवणे; परंतु उत्पन्न न दाखवणे, नियतकालिकांचा व्यय दाखवणे; मात्र त्यांचे उत्पन्न न दाखवणे, व्यय वाढवून दाखवणे, विदेशातून धन घेणे; परंतु त्याच्याशी निगडित कायद्याचा भंग करणे अशा स्वरूपाचे अंनिसवरील कित्येक आरोप आज सिद्ध होण्याच्या प्रक्रियेत आहेत. या वेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पारदर्शकता दाखवावी. ही पारदर्शकता त्यांनी ठेवली नाही, तर काही नवीन बाबी घेऊन आम्ही पुन्हा जनतेपुढे येऊ.

अंनिसच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी शासनाने तात्काळ करावी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

अंनिसने अनेक आर्थिक घोटाळे केलेले आहेत, याच्या तक्रारी याआधी अनेकवेळा मी सातारा धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पुराव्यांनिशी केलेल्या आहेत. आम्हीच नाही, तर सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद, वारकरी संप्रदाय आदींनीही वेळोवेळी याविषयी आवाज उठवला होता. आता अंनिसचेच कार्याध्यक्ष हे समाजासमोर मांडत आहेत. यातून आम्ही मांडत असलेल्या आरोपांतील सत्यता जगासमोर आली आहे. अविनाश पाटील यांनी मांडलेल्या सूत्रांवरून अंनिसच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी शासनाने तात्काळ करावी.