पणजी – छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यात बेतुल येथे बांधलेल्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी क्षत्रिय मराठा पारंपरिक मासेमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना २८ नोव्हेंबरला निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, आज गोवा म्हटले की, आधी पर्यटक, समुद्रकिनारे, समुद्र हेच सर्वांच्या डोळ्यांसमोर येते; पण त्यापेक्षाही कैकपटींनी मनाला भुरळ पाडणारा असा गोमंतकीय इतिहास आहे, हे केवळ काही मोजक्याच लोकांना ठाऊक आहे. जसे प्रत्येक ठिकाणाचे एक वेगळे महात्म्य आणि सौंदर्य असते, तसे बेतुल दुर्गाचेसुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला एकमेव सागरी दुर्ग म्हणून किल्ले बेतुल हा आहे. तो गोव्यातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे; पण आजच्या घडीला आपल्याच लोकांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे तो शेवटच्या घटका मोजत आहे. आज त्याचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.
बेतुल येथील किल्ला गोवा शासनाने विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत संवर्धित करून किल्ला परिसरात एक ऐतिहासिक संग्रहालय (म्युझियम) उभारले, तर किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा मिळू शकतो.
क्षत्रिय मराठा पारंपरिक मासेमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देतांना संघटनेचे सर्वश्री प्रमोद जुवेकर, विनय तारी, सज्जन जुवेकर, धीरज खराडे, रोहन जुवेकर, सुजान खराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.