मथुरा (उत्तरप्रदेश) येथील आश्रमातील २ साधूंचा संशयास्पदरित्या मृत्यू, तर तिसर्‍याची प्रकृती चिंताजनक

विषप्रयोग करण्यात आल्याचा एका साधूंच्या भावाचा आरोप

भाजपचे राज्य असणार्‍या उत्तरप्रदेशमध्ये सातत्याने साधू, संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

मथुरा (उत्तरप्रदेश) – गोवर्धनमधील जंगलात असलेल्या गिरीराज बागेच्या मागे ३ साधू एक वर्षापासून आश्रम सिद्ध करून रहात होते. यातील २ साधूंचे मृतदेह आश्रमात आढळून आले आहेत, तर तिसर्‍याची प्रकृती चिंताजनक आहे. साधूंच्या मृत्यूची माहिती समजताच येथे तणाव निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आश्रमात असलेल्या गायीच्या दुधापासून चहा प्यायल्यानंतर ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

गोपाल दास आणि श्याम सुंदर दास अशी मृत्यूमूखी पडलेल्या साधूंची नावे आहेत, तर रामबाबू दास यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू  आहेत. विष देऊन साधूंची हत्या करण्यात आल्याचा आरोप गोपाल दास यांचे भाऊ टीकम यांनी केला. आश्रमातून विषारी औषधांचा वास येत असल्याचा दावादेखील त्यांनी केला.