प्रवासी बसच्या पायर्या वृद्धांना चढता येत नाहीत, हे ठाऊक असूनही त्यासाठी उपाययोजना न करणारे भारतातील असंवेदनशील परिवहन खाते !
‘बसच्या पायर्या वृद्धांना चढता येत नाही. त्यासाठी बहुदा स्टूल ठेवलेले नसते. स्टूल असल्यास स्टुलावरून चढायचा प्रयत्न केला की, ‘आपण पडणार’, असे वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘भारतातील परिवहन खात्याच्या प्रवासी बसची रचना आपल्या सर्वांना ठाऊक आहे. बसमध्ये चढण्यासाठी ज्या पायर्या असतात, त्यांची उंची भूमीपासून अधिक असते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढ-उतार करतांना होण्यार्या अपघातांचे प्रमाणही अधिक असते. या कारणामुळे अनेक जणांना अपंगत्व आले आहे आणि वृद्ध व्यक्तींचा बसने प्रवास करण्याचा आत्मविश्वासही न्यून झाला आहे.
१. शारीरिक व्याधींमुळे बसच्या उंच पायर्यांवरून चढ-उतार करणे कठीण असणे
वृद्धांना बसमध्ये चढणे पुष्कळ कठीण असते. उतारवयामुळे त्यांचा तोल जातो. अनेक जणांना कंबर, पाठ, पाय, गुडघे अथवा तत्सम व्याधी असल्याने त्यांना पाय उचलून टाकता येत नाही. पायांत बळ नसल्याने ते कंबरेतून वाकलेले असतात, त्यामुळे त्यांना बसमध्ये चढता येणे शक्य नसते. अशा वेळी जर त्यांच्या समवेत साहित्य असेल, तर स्थिती अधिकच बिकट होते.
२. लाकडी किंवा लोखंडी स्टूलचा वापर करतांना आत्मविश्वास अल्प असणे
काही बस स्थानकांत वृद्ध व्यक्तींना बसमध्ये चढण्यासाठी लाकडी किंवा लोखंडी स्टूल दिले जाते. धरण्यासाठी कोणताही आधार नसलेल्या या स्टुलावर चढण्याचा प्रयत्न करतांना त्यांचा आत्मविश्वास अल्प असल्याने ‘आपण पडणार’, असे त्यांना वाटते. ९० टक्के वृद्ध व्यक्तींना काठीचा आधार घेतल्याविना एक पाऊलही टाकणे शक्य नसते. स्टुलावर चढतांना स्टुलाच्या उंचीमुळे ती काठीही जमिनीला टेकत नसल्याने त्याचाही आधार घेणे शक्य नसते. यामुळे त्यांना एकट्याने बसमध्ये चढण्याचा आत्मविश्वास नसतो.
३. वृद्ध व्यक्तींविषयी थोडीही ‘संवेदनशीलता’ नसल्याने एवढ्या वर्षांत त्यावर कोणतीही उपाययोजना न काढणे
खरे तर, वृद्ध व्यक्तींची ही समस्या आजची नाही. वर्षानुवर्षे हीच स्थिती आहे; पण एवढ्या वर्षांत यावर परिवहन मंडळाने कोणतीही उपाययोजना काढलेली नाही आणि त्याचे कारण म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या विषयी असलेली कमालीची ‘असंवेदनशीलता’ आणि ‘उदासीनता’ होय. अनेक वर्षे अनेक कटू घटना घडूनही परिवहन प्रशासनाने त्यातून कोणताही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे परिवहन खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींनाही अशा अडचणींना तोंड द्यावे लागत नसेल का ? तरीही त्यांनी त्याची उपाययोजना काढण्यासाठी पुढाकार न घेणे किंवा पुढाकार घेतला असला, तरी उपाययोजना निघेपर्यंत पाठपुरावा न करणे, हे त्यांच्या उदासीनतेचे लक्षण आहे.
४. शासनाने चाके असलेले जिने किंवा तत्सम उपाययोजना उपलब्ध करून देऊन वृद्धांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी गांभीर्याने विचार करणे आवश्यक असणे
आजकाल बाजारात आधुनिक प्रकारचे चाके असलेले लाकडी किंवा लोखंडी जिने मिळतात. वृद्धांना निश्चिंतपणे बसमध्ये चढता यावे, यासाठी शासनाने अशा प्रकारचे दोन किंवा तीन पायर्यांचे चाके असलेले जिने उपलब्ध करण्याचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे. यासह त्या जिन्यांना आधारासाठी दांडी (रेलिंग) असल्याची खात्री करणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी शासनाने परिवहन खात्याकडे निधी उपलब्ध असल्याची खात्री केली किंवा नसल्यास तो उपलब्ध करून दिला, तर अशा प्रकारचे काही जिने प्रत्येक बस स्थानकावर उपलब्ध होऊ शकतील. यासाठी आवश्यकता आहे, ती ‘प्रबळ इच्छाशक्तीची !’
– अश्विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२०)