वीज कर्मचार्‍यांनी घेतला संप मागे !

सातारा, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – दळणवळण बंदी काळापासून अद्यापर्यंत वीज कर्मचारी प्राणांची पर्वा न करता काम करत आहेत. शासनाने इतर विभागातील कर्मचार्‍यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले; मात्र वीज कर्मचार्‍यांना यापासून वंचित ठेवले. त्यामुळे वीज कर्मचार्‍यांनी दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून संप पुकारला; मात्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कर्मचार्‍यांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून त्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले. त्यामुळे वीज कर्मचार्‍यांनी दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून जाहीर केलेला संप मागे घेतला.

वीज अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रत्येकी १५ सहस्र रुपये, तर विद्युत् साहाय्यक आणि उपकेंद्र साहाय्यक यांना प्रत्येकी ९ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आले आहे. या संपात सातारा जिल्ह्यातील अनुमाने ५०० हून अधिक वीज कर्मचारी सहभागी होणार होते; मात्र ऐन दीपोत्सवात जनतेला अंधारात रहावे लागेल, याचा विचार करून ऊर्जामंत्र्यांनी युनियन पदाधिकार्‍यांनी चर्चा करून सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केल्याचे समजते.