देवघरात देवतांची मांडणी कशी करावी, याविषयीचे धर्मशास्त्र

‘देव्हार्‍यात देवतांची मांडणी करतांना ती शंकूच्या आकारात करावी. पूजा करणार्‍या भक्ताच्या समोर शंकूच्या टोकावर, म्हणजेच मध्यभागी श्री गणपति ही देवता ठेवावी. पूजा करणार्‍याच्या उजव्या हाताला स्त्रीदेवता ठेवाव्यात. त्यात कुलदेवीचे रूप आधी ठेवावे. कुलदेवीनंतर उच्च देवतांची उपरूपे असल्यास ती ठेवावीत. त्यानंतर ती ती उच्च देवता ठेवावी. पूजा करणार्‍याच्या डाव्या हाताला याच क्रमाने पुरुषदेवता, म्हणजे कुलदेव आधी, त्यानंतर उच्च देवतांची उपरूपे आणि त्यानंतर उच्च देवता ठेवाव्यात.

गणपति मध्यभागी ठेवावा. तो आपली नादभाषा समजू शकतो. गणपति नादाचे प्रकाशात आणि प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे. गणपति इच्छालहरींशी संबंधित असल्याने भक्ताच्या इच्छा किंवा भक्ताने देवाकडे केलेले मागणे तो कुलदेवी किंवा कुलदेव यांच्यापर्यंत पोचवतो. त्यानंतर कुलदेवी किंवा कुलदेव साहाय्य करतात. प्रत्यक्ष कुलदेव किंवा कुलदेवी देवघर आणि पूजेतील उपकरणेे जिवाच्या कामनापूर्तीसाठी उच्च देवतांकडे याचना करतात. त्यामुळे उच्च देवतांचे तत्त्व कार्यरत होऊन जिवासाठी कार्य करते.’ – एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावानेही लिहितात.)