श्री गणेशचतुर्थीला केलेल्या ‘सिद्धिविनायक व्रताच्या’ पूजाविधीतील चैतन्याने पूजकाला, तसेच पुरोहितांना आध्यात्मिक लाभ होणे

श्री गणेशचतुर्थीला केलेल्या ‘सिद्धिविनायक व्रताच्या’ पूजाविधीतून (श्री गणेशपूजनातून) पुष्कळ चैतन्य निर्माण होणे आणि त्यामुळे पूजकाला, तसेच पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

नावीन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. फोंडा, गोवा येथील श्री. आत्माराम जोशी यांनी त्यांच्या निवासस्थानी श्री गणेशचतुर्थीस ‘सिद्धिविनायक व्रत’ केले. त्यांच्याकडे दीड दिवस गणेशमूर्ती पूजण्यात येते. श्री. सिद्धेश करंदीकर यांनी या पूजाविधीचे पौरोहित्य केले. ‘सिद्धिविनायक व्रत केल्याचा पूजकाला (श्री. आत्माराम जोशी यांना), तसेच त्या व्रताचा पूजाविधी सांगणार्‍या पुरोहितांना (श्री. सिद्धेश करंदीकर यांना) आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १३ आणि १४ सप्टेंबर २०१८ या दिवशी श्री. आत्माराम जोशी यांच्या निवासस्थानी श्री गणेशपूजनस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत श्री गणेशचतुर्थीला, म्हणजे १३.९.२०१८ या दिवशी श्री गणेशपूजनापूर्वी आणि पूजनानंतर श्री गणेशमूर्ती, पूजक (श्री. आत्माराम जोशी) आणि पूजा सांगणारे पुरोहित (श्री. सिद्धेश करंदीकर) यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. १४.९.२०१८ दिवशी दुपारी उत्तरपूजेपूर्वी आणि उत्तरपूजेनंतर सर्वांच्या पुन्हा एकदा मोजणींच्या नोंदी करण्यात आल्या.

१४.९.२०१८ या दिवशी सायंकाळी श्री गणेशमूर्तीचे नैसर्गिक झरा असलेल्या एका जलाशयात (तलावात) विर्सजन करण्यापूर्वी आणि विसर्जन केल्यानंतर तेथील पाण्याचा नमुना घेऊन त्याच्याही मोजणींच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सौ. मधुरा कर्वे

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. श्री गणेशमूर्ती आणि पूजक यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ अ २. पुरोहितांमध्ये अल्प प्रमाणात असलेली ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा गणेशपूजन झाल्यानंतर नाहीशी होणे : श्री गणेशचतुर्थीला, म्हणजे १३.९.२०१८ या दिवशी गणेशपूजन आरंभ होण्यापूर्वी पुरोहितांमध्ये अल्प प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली. तेव्हा त्यांच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येत असल्याने पुरोहितांच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली नाही. गणेशपूजन झाल्यानंतर त्या पुरोहितांमधील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. पुरोहितांमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ अ ३. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर त्या जलाशयातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे : चाचणीतील श्री गणेशमूर्तीचे १४.९.२०१८ या दिवशी दुपारी जलाशयात विसर्जन करण्यात आले. विसर्जन करण्यापूर्वी त्या जलाशयातील पाण्याचा नमुना घेऊन त्याची मोजणी केली असता, त्या पाण्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली. तिची प्रभावळ ०.९८ मीटर होती. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर साधारण ३ घंट्यांनी (तासांनी) (टीप) पुन्हा एकदा तेथील पाण्याचा नमुना घेऊन त्याची मोजणी केली असता, त्या पाण्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झालेली आढळली. जलशयातील पाण्याच्या नमुन्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

टीप – १४.९.२०१८ या दिवशी चाचणीतील श्री गणेशमूर्तीचे ज्या जलशयात विर्सजन करण्यात आले, तेथे अन्य भाविकही दीड दिवस पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आले होते. त्यामुळे त्या भाविकांकडील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर तेथील पाण्याची मोजणी करण्यात आली.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशपूजन झाल्यानंतर, तसेच दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होणे

२ आ २. श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशपूजन झाल्यानंतर, तसेच दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर पूजकाच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होणे

२ आ ३. श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशपूजन झाल्यानंतर, तसेच दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर पुरोहितांच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होणे

२ आ ४. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर त्या जलाशयाच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होणे : श्री गणेशमूतीचे विसर्जन करण्यापूर्वी जलाशयातील पाण्याचा नमुना घेऊन त्याची मोजणी केली असता त्या पाण्यामध्ये थोडी सकारात्मक ऊर्जा आढळली; पण तिची प्रभावळ नव्हती. तेव्हा स्कॅनरच्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. श्री गणेशमूर्तीचे (टीप) जलाशयात विसर्जन केल्यानंतर साधारण ३ घंट्यांनी पुन्हा एकदा तेथील पाण्याचा नमुना घेऊन त्याची मोजणी केली असता त्या पाण्याच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झालेली आढळली. तेव्हा स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केल्याने तिची प्रभावळही मोजता आली. ती १.६० मीटर होती.

टीप – चाचणीतील श्री गणेशमूर्तीचे ज्या जलशयात विर्सजन करण्यात आले, तेथे अन्य भाविकांनीही दीड दिवस पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

टीप – एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धूलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

२ इ १. श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशपूजन झाल्यानंतर, तसेच दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर श्री गणेशमूर्तीच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

२ इ २. श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशपूजन झाल्यानंतर, तसेच दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर पूजकाच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

२ इ ३. श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशपूजन झाल्यानंतर, तसेच दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर पुरोहितांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

२ इ ४. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर त्या जलाशयाच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे : श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन करण्यापूर्वी जलाशयातील पाण्याचा नमुना घेऊन त्याच्या एकूण प्रभावळीची मोजणी केली असता ती १.५४ मीटर होती. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर साधारण ३ घंट्यांनी पुन्हा एकदा तेथील पाण्याचा नमुना घेऊन त्याच्या एकूण प्रभावळीची मोजणी केली असता ती २.१० मीटर होती. याचा अर्थ श्री गणेशमूर्तीचे (टीप) जलाशयात विसर्जन केल्यानंतर त्या जलाशयाच्या एकूण प्रभावळीत ०.५६ मीटर वाढ झाली.

टीप – चाचणीतील श्री गणेशमूर्तीचे ज्या जलशयात विर्सजन करण्यात आले, तेथे अन्य भाविकांनीही दीड दिवस पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि मूर्तीची एकूण प्रभावळ यांपैकी सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ गणेशचतुर्थीच्या गणेशपूजनानंतर अधिक वाढणे, तर एकूण प्रभावळ विसर्जनाच्या वेळी करण्यात येणार्‍या उत्तरपूजेनंतर अधिक वाढणे, यामागील शास्त्र : श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि मूर्तीची एकूण प्रभावळ गणेशचतुर्थीला गणेशपूजनाच्या पूर्वी आणि पूजनानंतर मोजली. त्याप्रमाणेच गणेशमूर्तीच्या त्या दोन्ही प्रभावळी गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या आधी करण्यात येणार्‍या उत्तरपूजेपूर्वी आणि उत्तरपूजेनंतर मोजल्या. गणेशपूजनानंतर आणि उत्तरपूजेनंतर गणेशमूर्तीच्या त्या दोन्ही प्रभावळींमधील वाढ पुढीलप्रमाणे होती. (यांविषयीची सविस्तर माहिती सूत्र ‘२ आ १’ आणि ‘२ इ १’ यांमध्ये दिली आहे.)

गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते आणि ते गणेशमूर्तीमध्ये आकर्षित होऊन साठवून ठेवले जाते. यामुळे त्या दिवशी गणेशपूजेनंतर गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. पुढे गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व कार्यरत असते; परंतु ते गणेशचतुर्थीच्या दिवशी जेवढे कार्यरत असते, त्यापेक्षा थोड्या अल्प प्रमाणात असते. गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या आधी उत्तरपूजा केल्याने गणेशमूर्तीमधील गणेशतत्त्वाचे कार्य संपल्यामुळे ते चैतन्य मूर्तीतून बाहेर पडून वातावरणात विलीन होऊ लागते. हे प्रक्षेपण गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीतून होत असलेल्या गणेशतत्त्वाच्या प्रक्षेपणापेक्षा पुष्कळ जास्त असल्याने उत्तरपूजेनंतर गणेशमूर्तीच्या एकूण प्रभावळीमध्ये झालेली वाढ गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशपूजनानंतर मूर्तीच्या एकूण प्रभावळीमध्ये झालेल्या वाढीपेक्षा पुष्कळ अधिक होती.

३ आ. श्री गणेशपूजनातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे पूजक आणि पुरोहित यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : श्री गणेशचतुर्थीला गणेशपूजक श्री. आत्माराम जोशी यांनी पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार श्री गणेशाचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन केले. पूजाविधीमुळे श्री गणेशमूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट झाले. त्यामुळे श्री गणेशमूर्तीची सकारात्मक ऊर्जा आणि मूर्तीची एकूण प्रभावळ यांमध्ये वाढ झाली. गणेशमूर्तीमधील गणेशतत्त्व आणि गणेशपूजनाच्या वेळी वातावरणात निर्माण झालेले चैतन्य यांमुळे पूजक श्री. आत्माराम जोशी अन् पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांना पुढीलप्रमाणे आध्यात्मिक स्तरावर लाभ झाले.

१. श्री. आत्माराम जोशी यांच्यामध्ये पूजनारंभी नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती, तसेच त्यांच्यामध्ये आधीपासूनच सकारात्मक ऊर्जा होती. श्री गणेशपूजनातून प्रक्षेपित झालेली सकारात्मक स्पंदने (चैतन्य) त्यांनी ग्रहण केली. त्यामुळे त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. त्यांच्या एकूण प्रभावळीत त्या सकारात्मक स्पंदनांची भर पडल्याने त्यांची एकूण प्रभावळही वाढली.

२. पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांच्यामध्ये पूजनाच्या आरंभी थोडी नकारात्मक ऊर्जा आढळली. त्यांच्यामध्ये आधीपासूनच सकारात्मक ऊर्जाही होती. श्री गणेशपूजनातील चैतन्यामुळे त्यांच्यात थोड्या प्रमाणात असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. पुरोहितांच्या एकूण प्रभावळीतील नकारात्मक स्पंदने नाहीशी झाल्याने, तसेच त्यांच्या सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ झाल्याने त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ झाली.

३ इ. श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा झाल्यानंतर पूजकाच्या सकारात्मक ऊर्जेत आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे : ‘श्री गणेशपूजेमुळे पूजा करणारा पूजक गणेशलहरींनी संपृक्त व्हावा’, हा पूजेचा उद्देश असतो. संपृक्तता वाढवण्यातला शेवटचा टप्पा म्हणजे उत्तरपूजा. उत्तरपूजेच्या वेळी मूर्तीत असलेली सर्व पवित्रके (श्री गणपतीच्या तत्त्वाची स्पंदने) एकदम बाहेर पडतात. उत्तरपूजा झाल्यावर मूर्ती स्थानापासून थोडी हालवतात. त्यामुळे उरलीसुरली पवित्रके मूर्तीपासून दूर जातात; म्हणून ती पूजा करणार्‍याला मिळू शकतात. चाचणीतील श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा झाल्यानंतर पूजक श्री. आत्माराम जोशी यांना श्री गणेशमूर्तीतील पवित्रके मिळाल्याने यांच्या सकारात्मक ऊर्जेत आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ झालेली दिसून आली. तसाच परिणाम पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांच्या संदर्भातही दिसून आला.

३ ई. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर त्या जलाशयातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे, तसेच त्याच्या सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत वाढ होणे : श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे तिच्यामध्ये असलेले चैतन्य पाण्यात मिसळते. त्यामुळे ते पाणी पवित्र बनते. वहात्या पाण्यासमवेत हे चैतन्य सर्वदूर पोचते आणि अनेकांना त्याचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याकारणाने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास साहाय्य होते. पूजेतील निर्माल्यामध्येही चैतन्य आलेेले असल्यामुळे निर्माल्य वहात्या जलस्रोतात विसर्जित करावे. पाने-फुले असे नैसर्गिक घटक असलेल्या निर्माल्यामुळे जलप्रदूषण होण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. याउलट रासायनिक घटक असलेल्या गोष्टींमुळे जलप्रदूषण होते. चाचणीतील श्री गणेशमूर्तीतील चैतन्य जलाशयात मिसळले गेल्याने त्या जलाशयातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली, तसेच जलाशयाच्या सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत वाढ झाली.

थोडक्यात सांगायचे, तर ‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सिद्धिविनायक व्रताच्या पूजाविधीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा पूजकाला, तसेच पूजाविधी सांगणार्‍या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला’, तसेच ‘श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.९.२०१८)

ई-मेल : [email protected]

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.