समाजकंटकांकडून बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयावर दगडफेक, रुग्णवाहिका जाळली

बेळगाव – येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त समाजकंटकांनी २२ जुलैच्या रात्री रुग्णालयासमोर थांबलेली रुग्णवाहिंका जाळली. जमावाने येथील पोलीस हवालदारास मारहाण करून पोलीस वाहन, बंदीवानांचे वाहन आणि रुग्णालय यांवर दगडफेक केली. या वेळी येथे उभारण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण यंत्रणेचेही नुकसान केले.

एका ५५ वर्षीय व्यक्तीला १९ जुलै या दिवशी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. रुग्णालय प्रशासन रुग्णाविषयी योग्य माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप जमावाने केला. २२ जुलैच्या रात्री अचानक त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर १०० हून अधिक लोक जमा झाले. रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता समर्पक उत्तर न दिल्याने जमाव अधिक आक्रमक बनला. (कोरोनाच्या काळात ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मनाई असतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात इतक्या अल्प वेळेत नागरिक जमा कसे होतात ? रुग्णालय प्रशासनाच्या चुका असल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणे, पोलीस ठाण्यात तक्रार करणे, तसेच अन्य अनेक पर्यांयांचा वापर करण्याऐवजी नागरिकांनी थेट कायदा हातात घेऊन दगडफेक करणे, रुग्णवाहिका जाळणे ही समाजद्रोही कृती आहे ! अशा समाजकंटकांना कह्यात घेऊन आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.  संपादक)

जमावातील लोक रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबले होते. या लोकांनी रुग्णालय परिसरातील साहाय्यता कक्षाच्या काचा फोडल्या. यानंतर जमावाने उपचारासाठी हिंडलगा कारागृहातील बंदीवानांना घेऊन आलेल्या आणि २ पोलीस वाहनांवर दगडफेक केली. नंतर जवळच थांबलेल्या रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेस आग लावली. २५ मिनिटे जळत असलेल्या रुग्णवाहिकेचा एक टायर फुटला. अग्नीशमन दलाचे वाहन येऊन आग विझवेपर्यंत रुग्णवाहिकेची मोठी हानी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्य पोलीस ठाण्याचे निरीक्षक, पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले. (चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे प्रशासन नेहमी घटना घडून गेल्यावरच घटनास्थळी कसे पोचते ? – संपादक)