जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

घटनेच्या वेळी पोलीस अनुपस्थित

काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार केले जात असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होते. जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याची शक्यता दुर्मिळच म्हणावी लागेल !

बांदीपोरा (जम्मू-काश्मीर) – येथे जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते शेख वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर यांना गोळ्या घालून ठार केल्याची घटना ८ जुलैला रात्री घडली. गोळीबारात हे तिघेही घायाळ झाले होते. त्यांना रुग्णालयात नेल्यावर त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर रात्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारी कुटुंबियांशी दूरभाष करून त्यांचे सांत्वन केले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हत्येच्या घटनेचा निषेध केला आहे.

(सौजन्य : Times Now)

शेख वसीम हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. ते त्यांच्या कुटुंबियांसमवेत एका दुकानाजवळ बसले होते. त्याच वेळी अचानक आलेल्या आतंकवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. वसीम यांना ८ पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात आली होती; मात्र या घटनेच्या वेळी तेथे त्यांचा एकही पोलीस उपस्थित नव्हता. या प्रकरणी त्या पोलिसांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. (असा निष्काळजीपणा अन्य कुठे होत आहे, याचाही शोध पोलिसांनी आता घ्यायला हवा ! – संपादक)