देशाची स्थिती पालटण्यासाठी स्वदेशी आंदोलनाच्या पुनरुत्थानाची आवश्यकता !

‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ईस्ट इंडिया आस्थापन गेले; मात्र कणाहीन आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज सहस्रो विदेशी आस्थापने भारताची लूट करत आहेत. राष्ट्र आणि धर्म अभिमानाचे धडे दिले न गेल्याने आज भारतीय समाजावरही पाश्‍चात्त्य संस्कृतीचा मोठा पगडा आहे. याचा अनुचित लाभ उठवत विदेशी राष्ट्रे भारताला स्वतःची बाजारपेठ बनवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल करत आहेत. येथील जनतेला देशोधडीला लावत आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी स्वदेशी आंदोलनाचे प्रणेते स्वर्गीय राजीव दीक्षित यांनी त्यांचे अवघे आयुष्य वेचले. या लेखात स्वदेशी आंदोलनाची पार्श्‍वभूमी, अन्य राष्ट्रांची स्वदेशीविषयीची जागरूकता आणि सद्यःस्थितीत स्वदेशी आंदोलनाची रूपरेषा कशी असावी, याविषयी स्वदेशी चळवळीचे प्रणेते स्वर्गीय राजीव दीक्षित यांच्या व्याख्यानातून संकलित केलेला भाग प्रसिद्ध करत आहोत.

गेल्या १० दिवसांपासून ‘स्वदेशीचा अंगीकार : विदेशी दास्यत्व झुगारून अंगी राष्ट्राभिमान बाणवणारेे व्रत !’ ही मालिका दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नियमित प्रसिद्ध करण्यात येत होती. आज या मालिकेचा शेवटचा भाग येथे देत आहोत.                                        (समाप्त)

१. भारतातील स्वदेशी आंदोलनाचा प्रारंभ आणि त्याला मिळालेला प्रतिसाद !

वर्ष १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालच्या केलेल्या फाळणीविरुद्ध भारतात स्वदेशीचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने देशभरातील लोकांना जागृत केले. परिणामतः वर्ष १९११ मध्ये बंगालची फाळणी रहित करण्यात आली. या स्वदेशी आंदोलनाच्या पायावरच भारतीय स्वातंत्र्याची अनेक आंदोलने चालली. या आंदोलनाची काही वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. स्वदेशी आंदोलनाच्या प्रेरणेने गावागावांत विदेशी कपड्यांची होळी होऊ लागली. या आंदोलनाने लोकांमध्ये एवढी चेतना निर्माण केली की, महिला, लहान मुले आणि विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले.

आ. विदेशी साहित्य विकल्या जाणार्‍या दुकानांसमोर उभे राहून महिला आणि लहान मुले सत्याग्रह करत. युवक दुकानांसमोर उभे राहून विदेशी साहित्य विकत घेण्यासाठी आलेल्यांचे प्रबोधन करत अन् एखाद्या व्यक्तीने जर साहित्य विकत घेतलेच, तर युवक त्याची होळी करून टाकत.

इ. स्वदेशीचा आग्रह एवढा तीव्र होता की, लोकांनी साखर खाणे बंद केले; कारण ती इंग्लंडमधून येत असे. बंगालच्या बहुतांश मिठाईवाल्यांनी साखरेपासून मिठाई बनवणे बंद केले.

ई. बहुतांश घरांमध्ये विदेशी मीठ वापरणे बंद झालेे.

उ. दाढी करणार्‍यांनी इंग्रजांच्या बनावटीच्या पात्यापासून दाढी करणे बंद केले.

ऊ. पंडित आणि पुरोहित यांनी विवाहात जर वधू-वर यांंनी परदेशी कपडे घातले असतील, तर तसे विवाह करणे बंद केले.

२. अन्य राष्ट्रांतील स्वदेशीविषयीची जागरूकता !

२ अ. आर्थिक डबघाईच्या स्थितीत लोकांमध्ये स्वदेशीची भावना रुजवून स्वावलंबी झालेला जपान ! : दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी नगरांवर दोन परमाणू बॉम्ब टाकून ती नष्ट केली. त्यातच दुसर्‍या महायुद्धातील सहभागामुळे जपानची अर्थव्यवस्था कोलमडली आणि जपान जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश झाला. या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी जपानी लोकांमध्ये स्वदेशीची भावना रुजवण्यात आली. यामध्ये जपानमधील टागूची नावाच्या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका होती. जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राकृतिक संपत्ती नसतांनाही जपानी लोकांमधील राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती आणि आत्मगौरव यांच्यामुळे वर्ष १९६५ पासून जपानचे चित्र पालटून देश स्वावलंबी होत आहे. स्वदेशी आंदोलनाच्या यशामुळे जपानचे लोक अजूनही विदेशी वस्तू वापरत नाहीत.

२ आ. बहुराष्ट्रीय आस्थापनांची मगरमिठी सोडवण्यासाठी स्वदेशी आंदोलन उभे करणारी रशिया ! : ९० च्या दशकाच्या रशिया संघाचे तत्कालीन राष्ट्रपती मिखायल गोर्बोचेव्ह यांनी जागतिकीकरण आणि उदारीकरण या नीतींचा अवलंब करून अंतर्गत अर्थव्यवस्थेला बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या हातात दिले. याचाच परिणाम म्हणून एके काळी शक्तीमान असलेले राष्ट्र लाचार झाले. पुढील ५-७ वर्षांत बहुराष्ट्रीय आस्थापनांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेची मोठ्या प्रमाणावर हानी केली. त्यामुळे देशाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या पुढचे राष्ट्रपती बोरीस येल्तसिन यांनी रशियात स्वदेशी आंदोलन चालू केले.

२ इ. इंग्रजांविरुद्धच्या हत्यारबंद लढाईला स्वदेशी आंदोलनाची जोड देणारी अमेरिका ! : १८ व्या शतकाच्या आरंभी अमेरिकेमध्ये स्वदेशीचे आंदोलन झाले. इतिहासकार फॉक्नर यांनी या स्वदेशीच्या आंदोलनाविषयी लिहिले आहे की, अमेरिकेचे इंग्रजांशी युद्ध चालू होण्यापूर्वी अमेरिकेने इंग्रजी मालाचा बहिष्कार करणे चालू केले. इंग्रजांचे ऊनी आणि सुती कापड अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विकले जात होते, ते घेणे बंद केले. अमेरिकेने मेंढीचे मांस खाणे बंद केेलेे; कारण अमेरिकेत ऊनी कपडे सिद्ध करण्यासाठी मेंढ्यांना वाचवता यावे. अमेरिकेतील धनाढ्य लोकांनी स्वदेशी कापड वापरणे चालू केले. तेथील लोकांनी जाडी खादी वापरणे चालू केले. हे स्वदेशीचे आंदोलन अमेरिकेने हत्यारबंद लढाईसह जोडले. यात अमेरिकेचा विजय झाला.

वरील उदाहरणांवरून स्पष्ट होते की, ज्या वेळी एखादा देश गंभीर आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक अडचणीत अडकतोेे, त्या वेळी देशातील जनतेला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी स्वदेशीच्याच मार्गाने जावे लागते.

३. भारतातील स्वदेशी आंदोलनाच्या पुनरुत्थानाचा मार्ग !

सर्वप्रथम देशातील मूल्ये आणि देश यांचा सन्मान करायला हवा. राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी भारतीय संस्कृती आणि भाषा यांवर गर्व करायला हवा. हे सर्व स्वदेशीवर आधारित जीवनशैली विकसित केल्यावर साध्य होऊ शकते. त्यासाठी स्वदेशी विचारधारांचा अधिकाधिक प्रचार करायला हवा. तसेच वर्ष १९०५ मध्ये भारतात जे स्वदेशीचे आंदोलन चालू झालेे, ते पुन्हा नव्या जोमाने चालू करायला हवे. त्यासाठी प्राथमिक टप्प्यात पुढीलप्रमाणे प्रयत्न करता येतील.

३ अ. घरातील दूरचित्रवाणी संच बंद करून मुलांना चारित्र्यहीन होण्यापासून वाचवा ! : ‘दूरचित्रवाणीवर जे सतत दाखवले जाते, त्याचेच अनुकरण मुले करतात. देहलीतील एका नामवंत शाळेतील ७० ते ८० टक्के मुले-मुली लैंगिक संबंधाच्या व्यसनात अडकल्याचे स्पष्ट झाले. तसेच भारतात प्रतिदिन लक्षावधी मुलींचे गर्भपात होतात आणि या मुलींची वये १४ ते २० वर्षे इतकी आहेत. हा दुराचार कुठून आला ? या सर्व गोष्टी दूरचित्रवाणीनेच शिकवलेल्या आहेत. मुलांमध्ये मानसिक आजार, आत्महत्या आणि उतावळेपणाने निर्णय घेऊन संपूर्ण आयुष्याची हानी करून घेण्यासंदर्भातील कित्येक उदाहरणे आजूबाजूला घडत आहेत. घरातील दूरचित्रवाणी संच बंद करा आणि आपल्या मुलांना चारित्र्यहीन होण्यापासून वाचवा; कारण चारित्र्य नाही, तर काही नाही.

३ आ. फसव्या विज्ञापनाने स्वतःच्या दैनंदिन वापरात आलेल्या विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाका ! : ‘कोलगेट, सिबाका, फोरहॅन्स आणि क्लोजअप, ही सर्व अमेरिकी आस्थापनांची उत्पादने आहेत. त्यांचा वापर करू नका. तसेच तोंडात अडकलेले अन्नाचे कण काढून तोंड स्वच्छ ठेवण्याचे काम आपली जीभच चांगल्या प्रकारे करते. त्यामुळे दंतकुंचल्यांच्या (दात घासण्याचा ब्रश) फसव्या विज्ञापनांना भुलू नका. कडूनिंब अथवा बाभळीची काडी ही दातांसाठी सगळ्यात उत्तम. तिचा वापर करा. विदेशी आस्थापनांच्या साहित्यावर बहिष्कार घालण्यासाठी अधिकाधिक जणांना प्रेेरित करा. बहिष्कार एक असे स्फोेटक आहे, जे मोठमोठ्या दास्याच्या पर्वतांना तोडते. स्वतःला लागणारी प्रत्येक वस्तू स्वतःच्या गावात सिद्ध होत असलेलीच घ्या. गावात बनत नसेल, तर तालुक्याच्या ठिकाणी बनणारी वस्तू घ्या, तिथे नसेल, तर जिल्ह्यात त्याचे उत्पादन होत असल्यास तेथील वस्तू विकत घ्या. यामुळे भारतातील पैसा भारतातच राहील, विदेशात जाणार नाही.

३ इ. केवळ अर्थलाभासाठी राष्ट्राला बुडवणार्‍या बहुराष्ट्रीय आस्थापनांची विज्ञापने करणार्‍या स्वकियांना जाब विचारा ! : अनेक प्रसिद्ध खेळाडूंसह कित्येक क्रिकेटपटू, नट-नट्या या विदेशी आस्थापनांचे विज्ञापन करतात. या सर्वांकडे कोट्यवधींची संपत्ती असतांना ते परदेशी आस्थापनांसमवेत अजूनही कोट्यवधींचे ठराव करतच आहेत. भारतियांनी या सर्वांना विचारायला हवे की, अमेरिकेसारख्या विदेशी राष्ट्रांनी भारतावर आर्थिक निर्बंध घालूनही तुम्ही त्यांच्या उत्पादनांचे विज्ञापन का करता ? असा जाब विचारल्यास या सर्वांना समाजात रहाणे कठीण होईल आणि ते विदेशी आस्थापनांच्या विज्ञापनांवर बहिष्कार टाकतील; कारण जे प्रेम आणि सन्मान भारतीय समाजाने त्यांना दिले आहे, तो त्यांना अमेरिका अथवा कुठेही मिळणार नाही.

३ ई. स्पर्धेची नको, सहकार्याची चळवळ उभारा ! : विदेशातील स्पर्धात्मक नीती पराकोटीच्या हिंसक प्रवृत्तींना उद्युक्त करते. यातून भारतातील पारंपरिक उद्योग जसे कापड गिरण्या, तेलाचे घाणे, चरखे असे अनेक छोटे-मोठे उद्योग मिळून ४ लक्ष ६२ सहस्र उद्योगालय बंद पडले आहेत. भारतात पूर्वी ७०० कापड गिरण्यांपैकी ३५० गिरण्या बंद पडल्या आहेत. स्पर्धेला कधीच अंत नसतो. यावर बहिष्कार टाकणे, हाच एक उपाय आहे.

भारतात ४ ते ५ टक्के लोकांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. ९५ ते ९६ टक्के लोकांना मूलभूत आवश्यकतांची पूर्तताही होत नाही. याचे कारण शोधतांना लक्षात आले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचाच इतर विदेशांकडून विकत घेतला आहे. विदेशात दारिद्य्र नसल्याने तेथील अर्थव्यवस्थेचा ढाचा स्पर्धात्मक हा आहे. विदेशातील विचारसरणीत व्यक्ती महत्त्वाची आहे. ‘मनुष्य बुद्धीमान आहे. त्याला हवी असलेली गोष्ट तो कोणत्याही थराला जाऊन मिळवू शकतो’, हे त्यांचे मूळ सूत्र आहे. भारतियांचा विकास मात्र सहकार्याविना होऊच शकत नाही. भारतियांनी स्पर्धेच्या जगाला सोडायला हवे आणि सहकार्याच्या जगात परतायला हवे. भारतियांनी स्वदेशी मालच विकत घ्यायला हवा, तरच आपण सहकार्याची भावना वाढवू शकतो. विदेशी मालावर बहिष्कार टाकणे आणि सहकार्याचा मार्ग अवलंबणे, ही सद्यःस्थितीतील विकासाची पहिली पायरी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

४. भारतीय वस्तूंपेक्षा विदेशी वस्तू स्वस्त का ?

भारतीय वस्तूंपेक्षा विदेशी वस्तू स्वस्त मिळते; कारण त्यांचा उत्पादन व्यय न्यून आहे. कारावासात बंदी असणार्‍यांकडून ते मालाचे विनामूल्य उत्पादन करून घेतात. तिथे कामगार संघटना नियम नाही. ते कामावरून कधीही काढू शकतात. त्यांना त्याविषयी काहीही वाटत नाही; कारण त्यांना स्पर्धेत टिकून रहायचे आहे. त्यांना व्यवसायासाठी ९० पैसे प्रती युनिट वीजपुरवठा होतो. त्यामुळे ते वस्तू स्वस्त विकू शकतात.

भारतियांना काम करतांना वीज दामदुप्पट पैसे व्यय करून घ्यावी लागते. विविध कर भरावे लागतात; म्हणून भारतीय माल स्वस्तात विकू शकत नाही. आपण सहकार्याच्या भावनेने स्वदेशी माल विकत घेतला, तर मालाची विक्री वाढेल. मागणी वाढली की, पुरवठा वाढेल, मग हीच वस्तू हळूहळू स्वस्त मिळू शकेल. या सर्व विकासाच्या व्यवस्था भारतात राबवल्या, तर २५ वर्षांत या देशाचे चित्र पालटेल; कारण भारतीय मान्यतानुसार सहकार्यानेच विकास होऊ शकतो.’

– स्वदेशी चळवळीचे प्रणेते स्वर्गीय राजीव दीक्षित