नाशिक – जीवनावश्यक वस्तूूच्या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने चालू ठेवावीत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. असे करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकार्यांशी चर्चा करतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हे स्पष्ट केले.
नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा व्हावा, तसेच सर्वप्रकारचे दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार सुरळीत रहावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने माहिती आणि साहाय्यासाठी ‘टीम संकट सोबती’ सिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १७ अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक अधिकार्याकडे वेगवेगळे विषय देण्यात आले असून संबंधित अधिकार्यांचे संपर्क क्रमांक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दिले आहेत. या परिस्थितीमध्ये ज्या नागरिकांना काही अडचणी येत असतील, त्यांनी संबंधित अधिकार्याला संपर्क केल्यास त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील.