शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करतांना कु. सुप्रिया जठार यांना आलेल्या अनुभूती

‘मला होणार्‍या काही शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता न्यून होण्यासाठी १३.१२.२०१६ या दिवशी मला ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करण्यास सांगितला होता. देवाच्या कृपेने माझा नामजप चालू झाला आणि या नामजपामुळे मला पुढील अनुभूती आल्या.

कु. सुप्रिया जठार

१. नामजप चालू झाल्यावर ब्रह्मदेवाने सूक्ष्मातून साधिकेला कमळात बसवणे आणि कमळामध्ये तिला पुष्कळ सुरक्षित वाटणे

नामजप चालू झाल्यावर ब्रह्मदेवाने मला त्याच्या कमळात बसवले. त्यामुळे मला होणार्‍या शारीरिक वेदना न्यून होऊ लागल्या. थोड्या वेळाने ते कमळ मिटले, म्हणजे कळीसारखे झाले आणि मी त्याच्या आत बसले होते. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, ‘वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून हे कमळ तुझे रक्षण करील. जेवण, न्याहारी, सेवा, सगळे काही तू या कमळात राहून कर.’ कमळामध्ये मला पुष्कळ सुरक्षित वाटत होते. ब्रह्मदेवाने ते कमळ कळीसारखे करण्यामागील आणखी एक उद्देश सांगितला, ‘तुला बाह्य जगाकडे बघायचे नाही, तर अंतर्मुख व्हायचे आहे.’

२. उत्तरदायी साधकांनी साधिकेच्या चुका लक्षात आणून दिल्यावर चुकांचा ताण, निराशा किंवा दुःख न वाटता चुका लक्षात आणून दिल्याविषयी कृतज्ञता वाटू लागणे

दुसर्‍या दिवशी एका साधिकेने कमळ दिले आणि ते आध्यात्मिक लाभासाठी असल्याचे सांगितले. देवाने आदल्या दिवशी सूक्ष्मातून आणि दुसर्‍या दिवशी स्थुलातून प्रचीती दिली. दुसर्‍याच दिवशी उत्तरदायी साधकांनी माझ्या अशा काही चुका लक्षात आणून दिल्या की, ज्या अनेक दिवसांपासून माझ्याकडून होत होत्या; पण मला त्यांची कधी जाणीवच झाली नव्हती. ‘ब्रह्मदेवाने मला अंतर्मुख होण्यास का सांगितले ?’, याचा उलगडा झाला. तेव्हा पहिल्यांदाच असे घडले की, मला चुकांचा ताण, निराशा किंवा दु:ख असे काही न होता चुका लक्षात आणून देणार्‍याविषयी कृतज्ञता वाटू लागली.

३. ‘भोजनकक्षातील चुकांच्या फलकावरील प्रत्येक चूक साधिकेचीही कशी आहे ?’, याची ब्रह्मदेवाने जाणीव करून देणे

थोड्या वेळाने मी जेवायला भोजनकक्षात गेले. भोजनकक्षातील चुकांचा फलक पाहून ‘त्यावर लिहिलेली प्रत्येक चूक माझी कशी आहे ?, याची ब्रह्मदेव मला जाणीव करून देऊ लागला. त्या चुका माझ्याकडून कुठेकुठे झाल्या आहेत आणि होत आहेत’, ते ब्रह्मदेव मला सांगत होता. आधी मी चुकांचा फलक वाचत नव्हते; कारण चुका वाचल्यावर त्या साधकांविषयी माझ्या मनात नकारात्मकता येत असे. ब्रह्मदेवाने सगळेच पालटून टाकले.

गुरुमाऊलीप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता

‘गुरुमाऊली, एक म्हण आहे, ‘घोड्याला तलावापर्यंत नेता येते; पण त्याला पाणी पाजता येत नाही.’ इथे तर ब्रह्मदेवाने माझ्यासाठी तलाव निर्माण केला, तेथपर्यंत आणले, पाणी पाजले आणि ते माझ्या शरिरात जिरवलेही (चित्तावर अंतर्मुखतेचा संस्कार केला). माऊली, देवाने माझ्यासाठी इतके करावे, यासाठी मी पात्र नाही. माऊली, तुमच्याच कृपेमुळे मी हे अनुभवू शकले. त्यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘या अज्ञानी आणि मूढ बालकाची बोबडी कृतज्ञता माऊलीने स्वीकारावी’, अशी प्रार्थना !’

तुमची,

– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१३.१२.२०१६)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.